Join us

पोटाची खळगी भरण्यासाठी धावून आले  ‘कोरोना वॉरियर्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 4:59 PM

कोरोना वॉरियर्स : लाख मोलाचे कार्यकर्ते; जीवावर उदार होत भरले जातेय हातावरचे पोट 

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, लोकप्रतिनिधीदेखील रात्रीचा दिवस करत आहेत. मात्र रात्रीचा दिवस करण्यात केवळ लोकप्रतिनिधी आघाडीवर नाहीत तर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनामुळे त्यांना हे शक्य होत आहे. हे लाख मोलाचे कार्यकर्ते आजघडीला कोरोनाशी लढत आपल्या जीवावर उदार होत झोपड्या, चाळी, इमारतीमध्ये दाखल होत लोकांना मदत करत आहेत. अशाच काहीशा तळागाळतल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींनीदेखील सलाम ठोकला असून, त्यांच्यामुळेच आम्ही असल्याची भावना व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जेवढी सुरक्षा बाळगता येईल तेवढी बाळगत हातावरले पोट भरण्याचे काम नित्यनियमाने करत आहेत.

महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर देवरे हे आजघडीला कार्यकर्त्यांसोबत मुलुंड येथे काम करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यापासून येथील गरजू कुटूंंबांना त्यांच्याकडून अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. आजपर्यंत १६५ अधिक कुटूंबांना देवरे यांच्यासोबत असलेल्या सहका-यांनी मदत केली आहे. या कार्यकर्त्यांमध्ये प्रविण राऊत, वैभव जगताप, महेश मालुष्टे, महेंद्र उंबारकर, दत्ता वैती, जयेश पवार, सुरेश मुदलियार यांचा समावेश आहे. कुर्ला येथील मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनीदेखील झोपड्यांसह चाळी, इमारतीमधील लोकांना अन्नधान्य, जेवण, खिचडी यांचे वाटप करत आहेत. हे करताना तुर्डे यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी फळी काम करत आहे. तुर्डे याबाबत सांगतात की, मनीष येलकर, राजू साळवी, राजेश धुळे, विशाल कदम, सचिन सोनवणे, प्रणव तिरोडकर, संदिप पारकर, राकेश रक्षे, शिवाजी गायकवाड, दिपक आस्रे, रामू साहू, नितीन कांबळे हे सगळे माझे सहकारी आहेत. यांच्याशिवाय मला काहीच शक्य नाही. हे आहेत म्हणून मी आहे. त्यांच्या जीवावर उदार होत ते काम करत आहेत. असे कार्यकर्ते मिळण्यास नशीब लागते. आम्ही काम करताना पुर्ण सुरक्षितता बाळगून काम करत आहोत.

 

शिवसेना शाखा ५२ येथील शाखाप्रमुख संदिप गाढवे यांनी सांगितले की, पश्चिम उपनगरात आम्हीदेखील धान्यवाटप करत आहोत. गरजू व्यक्तींना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. हे करताना माझ्यासोबत बारा सहकारी आहेत. बारा सहका-यांमध्ये सचिन सांवत, सुभाष जाधव, दर्शन लोटनकर, समीर गुरव, रोशन बिल्ले, विनायक खेडेकर, ऋषीकेश तेंडुलकर, गणेश घडशी, विजय यादव, सनी आवाडे यांचा समावेश आहे. बारा सहका-यांनाही हे काम करताना सुरक्षा कशी घ्यायची याची माहिती देतो. मालाड येथील फाईट फॉर राईट फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांच्यासोबत योगेश केणी, मंथन पाटील, पुजा कारेकर, नितीन केणी, गणेश परदेशी, मनोज वाढेर ही कार्यकर्त्यांची फळी काम करत आहे. रस्त्यावरील बेघर मुलांना बिस्किट देण्यासह पोलीसांना मास्क आणि सॅनिटायझर्स वाटपाचे काम घोलप करत आहेत. भायखळा येथील रोहिदास लोखंडे यांचे कार्यकर्तेदेखील कामगारांना, गरिबांना, हातावर पोट असलेल्यांना अन्नदान करत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ही सेवा सुरु  आहे. आणि हे करताना अधिकाधिक काळजी, खबरदारी कशी घ्यायची याचीही जनजागृती केली जात आहे. चेंबूर येथील भाजपचे सुभाष मराठे निमगावकर यांनीदेखील कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. घर कामगार महिलांसह गरिबांपर्यंत पोहचणे केवळ कार्यकर्त्यांमुळे पोहचणे शक्य होत असल्याचे मराठे यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई