Join us

कोरोनानंतर वेदनाशामक गोळ्यांच्या वापरात झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या शरीराला काही त्रास झाला तर पेनकिलर गोळी घेण्याचे आपल्यावर संस्कारच झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या शरीराला काही त्रास झाला तर पेनकिलर गोळी घेण्याचे आपल्यावर संस्कारच झाले आहे. परंतु वेदनाशामक औषधांचे अतिसेवन हे आरोग्यासाठी त्रासदायक आहे. कोरोना महामारीनंतर तर वेदनाशामक गोळ्यांचा वापर वाढला आहे. पण ते आरोग्यासाठी धोकादायक आहे, असे मत तज्ज्ञांनी वेदना जागरूकता महिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.

अमेरिकन क्रोनिक पेन असोसिएशनद्वारा संपूर्ण जगभर सप्टेंबर हा महिना हा वेदना जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. याविषयी ज्येष्ठ फिजिशियन व छातीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ यांनी सांगितले, अंग दुखणे म्हणजेच शरीराला सतत त्रास होत राहणे होय. या अंगदुखीचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. यामध्ये छातीत दुखणे, गुडघे व सांधे दुखणे, तसेच जे नागरिक उदरनिर्वाहासाठी अंगमेहनतीची कामे करतात, ते अंगदुखीने बेजार असतात.

अनेक आजारांमध्ये अंग मोडून येऊ शकते. प्रामुख्याने संसर्गजन्य ताप, मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू, अशा आजारांमध्ये तापासोबत अंग दुखते. काहीवेळा शरीरातील डी जीवनसत्व कमी असल्याने सांधेदुखी होते. दात दुखणे, हातापायात वेदना होणे, डोकेदुखी अशा सर्वसाधारण आजारांमध्ये अनेक जण पेनकिलर घेतात, त्यामुळे त्यांना तात्पुरता आराम मिळतो. परंतु त्या आजाराची कारणे शोधली पाहिजेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जी औषधे वापरली गेली, त्या औषधांचा वापर दुसऱ्या लाटेत कमी झाला. परंतु आजही अनेकदा पहिल्या लाटेचेच प्रीस्क्रिप्शन वापरले जाते. अनेकवेळा हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक या आजाराची सौम्य लक्षणे दिसल्यावर अनेक जण वेदनाशामक गोळ्यांचे सेवन करतात. तसेच पेनकिलरच्या अतिसेवनामुळे किडनी व हृदयाला सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो, असेही भुजबळ यांनी सांगितले.

सेल्फ मेडिकेशन धोक्याचे

सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्व-औषधपद्धती ही एखाद्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाद्वारे स्वतःवर औषधोपचार करणे. आपल्या देशात कोणतेही असे घर नाही जिथे डोकेदुखी, सर्दी-खोकला, पाठदुखी आणि इतर अनेक आजारांसाठी औषधे उपलब्ध नाहीत. या औषधांमध्ये ८० टक्के ही पेनकिलर असतात. कोरोना महामारीशी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र लढत असून, पेनकिलर घेऊन आजार अंगावर काढणे आजमितीला परवडणारे नाही, अशी माहिती डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिली.