पालिका प्रशासन; ‘मिशन सेव्ह लाईफ’ची कठाेरपणे अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहर, उपनगरांचा मृत्युदर हा तीन टक्के आहे. ताे कमी करून एक टक्क्याच्या खाली आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि तज्ज्ञ काम करीत आहेत. याचसाठी येत्या काही दिवसांत पालिकेच्या वतीने ‘मिशन सेव्ह लाईफ’ कठोरपणे अमलात आणण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, काेराेनामुळे मार्च महिन्यात २१२ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीत ही संख्या १११ होती. त्यामुळे मृत्युदरात १.८ टक्क्यांनी वाढ झाल्याची चिंताजनक स्थिती आहे. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जून महिन्यात ५.५ टक्के असलेला मृत्युदर आता तीन टक्क्यांवर आला आहे. शिवाय, आता रुग्णालयांना रुग्णांसंदर्भातील अतिजोखमीचे आजार, उपचार प्रक्रिया, औषधे, दाखल करतानाची स्थिती अशा अनेक बाबींवर अधिक लक्ष देऊन नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही सर्व माहिती त्याच दिवशी विभागवार असणाऱ्या वाॅर रूमना देण्यासही सांगितले आहे.
सध्या मुंबईचा मृत्युदर २.८७ टक्के आहे. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असून राज्याचा मृत्यूदर १.९८ टक्के आहे. याविषयी, कोरोना टास्क फोर्सचे मृत्युविश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मुंबईत अजूनही दैनंदिन मृत्यूंची संख्या नियंत्रणात आहे. मात्र राज्यात उलट स्थिती असून, दैनंदिन मृत्यूंची संख्या जवळपास २०० च्या घरात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, सॅनिटायजिंग, सुरक्षित अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. याशिवाय, ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, त्यांचे लवकर निदान झाल्यास ते उपचार प्रक्रियेत लवकर येऊ शकतात. मात्र उशिरा निदान आणि रुग्णालयात भरती होण्यास विलंब होत असल्याने मृत्यू ओढवल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने निदानाच्या प्रक्रियेत येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
* सहवासितांच्या शाेधावर भर
दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सहवासितांच्या शोधावर भर देत आहोत; त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
................................................