- ओमकार गावंडमुंबई : कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने आता सरकारने चित्रपट गृह उघडण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृहांना शासनाने जारी करून दिलेल्या नियमावलीनुसार त्यांनी तयारी देखील केली आहे. मात्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटच नसल्याचे सगळीकडे चित्र दिसून येत आहे. मुंबईत जवळपास ८० सिंगल स्क्रीन चित्रपटगृह आहेत. तर चारशेपेक्षा अधिक मल्टिप्लेक्स आहेत. मार्च महिन्यापासून चित्रपटगृह बंद असल्याने मुंबईतील चित्रपटगृहांना तब्बल ९०० कोटींचा फटका बसला आहे.
कोरोनामुळे अजूनही काही नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. अशात चित्रपटगृहांमध्ये ऐन दिवाळीत चित्रपट नाहीत, यामुळे दिवाळीमध्ये कमाई होणार की नाही असा प्रश्न चित्रपटगृह मालकांपुढे उभा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांसाठी विशेषतः सिंगल स्क्रीन सिनेमांमध्ये जुने मराठी चित्रपट लावण्यात येणार आहेत.
प्रत्येक आठवड्यात नाटक व सिनेमा पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. मार्च महिन्यापासून या दोन्ही गोष्टींना मुकल्या मुळे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. मात्र आता मी कुटुंबासोबत चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणार आहे. - नरेश दुराफे, प्रेक्षक
यंदाच्या दिवाळीत हे सिनेमा दाखविणार यंदाच्या दिवाळीत सिनेमागृहात एकही नवीन हिंदी सिनेमा प्रदर्शित होणार नाही. यामुळे मागील वर्षांमध्ये काही गाजलेले हिंदी सिनेमा पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेषतः बच्चेकंपनीसाठी काही विशेष सिनेमा चित्रपटगृहांमध्ये लावण्यात येणार आहेत.