Join us  

कोरोना : कामगारांच्या आश्रितांना मासिक पेन्शनच्या स्वरूपात रोख लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:05 AM

मुंबई : कोरोनामुळे लाभार्थ्यांना व त्यांच्या आश्रितांना होणारा त्रास दूर करण्यासाठी भारताच्या अग्रणी सामाजिक सुरक्षा संस्थेने म्हणजे ...

मुंबई : कोरोनामुळे लाभार्थ्यांना व त्यांच्या आश्रितांना होणारा त्रास दूर करण्यासाठी भारताच्या अग्रणी सामाजिक सुरक्षा संस्थेने म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कोविड रिलिफ स्कीम सुरू केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या, ईएसआय कायद्यात समाविष्ट असलेल्या कामगारांच्या आश्रितांना मासिक पेन्शनच्या स्वरूपात रोख लाभ देणारी ही लाभ दायक योजना आहे. यामध्ये कोरोनामधून बऱ्या झालेल्या मात्र कोरोनासंबंधित झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

योजनेंतर्गत लाभाचा संपूर्ण दर मृत आयपीच्या सरासरी वेतनाच्या ९० टक्के असेल, जो थेट त्याच्या आश्रितांच्या बँक खात्यात दिला जाईल. योजनेंतर्गत किमान लाभ दरमहा १ हजार ८०० रुपये असेल. या योजनेत मृत कामगारांची जोडीदारही वर्षाकाठी १२० रुपये नाममात्र योगदानावर वैद्यकीय सेवेसाठी पात्र ठरेल. याबाबतची लाभ मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने पात्रता अटी शिथिल केल्या आहेत. कोरोनामुळे मरण पावलेला कामगार कोरोना निदानाच्या तारखेच्या कमीत कमी तीन महिन्यांपूर्वी ईएसआयसी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीकृत असावा. निदानाच्या तारखेला नोकरी असणे आवश्यक आहे. किमान ७० दिवसांचे योगदान निदानाच्या तत्पूर्वी एका वर्षात त्याला देय किंवा दिले गेले असावे. ही योजना २४.०३.२०२० पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी पूर्वलक्षी रीतीने अमलात येईल.

-------------

योजनांत भर

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच आम्ही वंचित कामगारांना मिळणाऱ्या फायद्याचे लक्षित वितरण सुनिश्चित करण्याचे मार्ग, उपाय शोधत आहोत. आमच्या विमाधारक व्यक्तीचे जीवन व उपजीविका सुरक्षित करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका निभावण्याच्या मार्गावर केंद्र सरकारने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कोविड रिलिफ स्किमने उपाय योजनांच्या यादीत भर पडली आहे. यात अटल विमित व्यक्ती कल्याण योजनेसारख्या योजनांचा समावेश आहे.

- प्रणय सिन्हा, अतिरिक्त आयुक्त, प्रादेशिक संचालक, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, महाराष्ट्र

-------------

तक्रार निवारण अधिकारी

सदर योजने संदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी सार्वजनिक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत. सार्वजनिक तक्रार निवारण अधिकाऱ्यांचा तपशील ईएसआयसीच्या वेबसाइट www.esic.nic.in वर उपलब्ध आहे.

-------------

२ हजारांपेक्षा अधिक बेड्स

महाराष्ट्रात आता १५ ईएसआयसी/ईएसआयएस रुग्णालयांमधील २ हजारांपेक्षा अधिक बेड्स कोरोना उपचारासाठी समर्पित करण्यात आली आहेत.

-------------

- कर्मचारी राज्य विमा योजना महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत पूर्णत: तर ९ जिल्ह्यांत अंश स्वरूपात कार्यान्वित आहे.

- राज्यात ६ उप क्षेत्रीय कार्यालये आहेत. यात पुणे, मरोळ, ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकचा समावेश आहे.

- राज्यात ७९ शाखा कार्यालये आहेत. यात ६७ शाखा कार्यालये व १२ औषधालय-सह-शाखा कार्यालये आहेत.

- १५ रुग्णालये आहेत.

- अटल विमित कल्याण योजनेंतर्गत गतवर्षी ०७ हजारांपेक्षा अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत. तसेच ०९ कोटींपेक्षा अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे.