Join us

‘कोरोनाकाळ’ आलाय ! दिवसभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल २३ हजारांचा टप्पा ओलांडल्याने पुन्हा एकदा मागील वर्षीच्या कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाची ...

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल २३ हजारांचा टप्पा ओलांडल्याने पुन्हा एकदा मागील वर्षीच्या कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाची सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, यंत्रणांसमोर संसर्ग नियंत्रणाचे आव्हान असून, दुसरीकडे सामान्य नागरिकांनीही कोरोनाविषयी मनोवृत्ती बदलण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात दैनंदिन रुग्ण २० हजारांपर्यंत पोहोचले होते.

राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात एक लाख ५२ हजार ७६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात नऊ हजार १३८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के झाले असून, मृत्युदर २.२४ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ७५ लाख ३५ हजार ४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख ७१ हजार ६२० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, सहा हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बुधवारी नोंद झालेल्या एकूण ८४ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे ७, नाशिक ३, गडचिरोली २, नागपूर १ आणि नांदेड १ असे आहेत. या ८४ मृत्यूंमध्ये मुंबई ८, नवी मुंबई मनपा १, उल्हासनगर मनपा ८, रायगड १, पनवेल मनपा ३, नाशिक १, नाशिक मनपा ५, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव मनपा १, नंदुरबार १, सोलापूर २, सातारा १, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, जालना ७, उस्मानाबाद १, बीड २, नांदेड १, नांदेड मनपा २, अमरावती ४, अमरावती मनपा २, नागपूर ४, नागपूर मनपा १२, वर्धा २, चंद्रपूर २, गडचिरोली २ आणि अन्य राज्य-देशातील एका रुग्णांचा समावेश आहे.

बाधितांच्या प्रमाणात १३ टक्क्यांनी वाढ

राज्यात कोरोना प्रसाराचा वेग वाढला असून, बाधितांचे प्रमाण सरासरी १३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आठवडाभरातील नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांवरून ९० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या (२०२०) जुलैप्रमाणे स्थिती झाली असून, आठवड्याला ५० हजार रुग्णांची नव्याने भर पडली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णसंख्या ४ टक्क्यांनी वाढून ९० हजारांपर्यंत गेला आहे. यापूर्वी ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ८९ ते ९० हजार रुग्णांचे निदान होत होते.

सात दिवसांत एक लाख १८ हजार ४५० कोरोना रुग्ण

१७ मार्च - २३,१७९

१६ मार्च - १७,८६४

१५ मार्च - १५,०५१

१४ मार्च - १६,६२०

१३ मार्च - १५,६०२

१२ मार्च - १५,८१७

११ मार्च - १४,३१७

कोरोना परत आलाय ! मुंबईत दोन हजार ३७७ रुग्ण

मुंबईत बुधवारी दोन हजार ३७७ रुग्ण आणि आठ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाख ४९ हजार ९५८ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ५४७ झाला आहे. सध्या शहर-उपनगरात १६ हजार ७५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १४५ दिवसांवर आला आहे. १० ते १६ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.४८ टक्के झाला आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ३४ असून, सक्रिय सीलबंद इमारती २६७ इतक्या आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील १२ हजार ५६१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाच्या ३६ लाख १४ हजार ५२८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.