विलेपार्लेच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये ८ कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:35 PM2020-04-20T18:35:19+5:302020-04-20T18:36:07+5:30
पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम एस.व्ही.रोड येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने खळबळ माजली आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई शहरातील जसलोक, केईएम, वाडिया या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असतांना, आता पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम एस.व्ही.रोड येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने खळबळ माजली आहे. या हॉस्पिटल मधील 1 डॉक्टर, 2 नर्स, 1 मार्केटिंग एक्झिकेटीव्ह, 1 सुरक्षा रक्षक, 1 किचन बॉय, 1 एसी मेंटेनन्स स्टाफ, 1 लॉड्रीवाला अश्या एकूण 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पश्चिम उपनगरातील हे गजबजलेले हॉस्पिटल असून येथे नेहमी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असते.त्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी कोरोनाची लागण येथे उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेे या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांची कसून शोध मोहिम घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे केली आहे. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर पालिकेने येथील प्रत्येक कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट केली असून जोपर्यंत कोरोनाचा टेस्टचा रिपोर्ट येत नाही तो पर्यंत आम्ही येथील कर्मचाऱ्यांना घरी क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले असल्याची माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त विश्वास मोटे यांनी लोकमतला ही माहिती दिली. गेल्या शनिवारी येथील येथील 27 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्या मालवणी येथील घरातील 6 कुटुंब सदस्यांना येथील जनकल्याण नगर येथे पालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या मालवणी येथील जनकल्याण नगर सेंटरला क्वारंटाईन करण्यात आले.तर मालाड पोलिसांनी या कर्मचाऱ्याचे घर व परिसर सील केला आहे.