मीरारोड - भाईंदरच्या गणेश देवल नगर या दाट वस्ती असलेल्या झोपडपट्टीत कोरोनाचे 16 रुग्ण सापडले असून येथील एकाचा मृत्यू झालेला आहे . येथे कोरोना झपाट्याने पसरण्याची भीती पाहता आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने येथील सुमारे 100 ते 125 कुटुंबाना मीरारोडच्या डेल्टा गार्डन जवळ हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाईंदर पश्चिमेला असलेली गणेश देवल नगर हि अतिशय दाटीवाटीची वस्ती असलेली झोपड्पट्टी आहे . लॉकडाऊन असूनही सकाळी लवकर आणि रात्री येथे सर्रास विविध वस्तू विक्रीच्या हातगाड्या लागतात. जेणे करून गर्दी आणखी होते . यातील काही भाग गणेश आनंद , क्रांती नगर व बजरंग नगर म्हणून ओळखला जातो . गुरुवारी याच परिसरातील 11 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल येताच खळबळ उडाली . या आधी सदर भागातून 5 जणांना कोरोना झाल्याने रुग्णालयात दाखल केलेले आहे.
1 मे रोजी येथीलच एक जण कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तेथे कोरोना मुळे मृत्यू झाला होता . परंतु सदर मृत्यूची नोंद पालिकेने त्यांच्या दैनंदिन अहवालात घेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले . सदर मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने अन्य काही जणांना कोरोनाची लागण झालेली आहे . या शिवाय भाजी विक्रेता , किराणा दुकानदार व रिक्षा चालक ना सुद्धा कोरोना झाला असून त्यांचा संपर्काचा इतिहास ती मृत व्यक्ती नसल्याचे समोर आले आहे .
सदर झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे , उपायुक्त संभाजी वाघमारे , वैद्यकीय अधिकारी आदींनी आज सदर झोपडपट्टीची पाहणी केली .
उपायुक्त वाघमारे म्हणाले कि , येथील दाट वस्ती व लोकांचा राबता पाहून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या परिसरातील सुमारे 100 ते 125 कुटुंबाना आता मीरारोडच्या डेल्टा गार्डन जवळील स्वतंत्र इमारतीत 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या ठिकाणी कुटुंबीयांची जेवण आदी सर्व व्यवस्था पालिका करणार आहे . तर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासह घरोघरी तपासणी करणे, मास्क आदी साहित्य देणे व जनजागृती केली जात आहे .