भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील २९ लाख नोकऱ्या धोक्यात, कोरोनाचा आफ्टरशॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:57 PM2020-04-25T18:57:24+5:302020-04-25T18:57:48+5:30
कोरोनामुळे जागतिक स्तरावर असलेल्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसमोरील समस्या अधिक गंभीर होत चालली आहे.
मुंबई : कोरोनामुळे जागतिक स्तरावर असलेल्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसमोरील समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) च्या अंदाजानुसार भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील सुमारे २९ लाख जणांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती आहे. आशिया पॅसिफिक विभागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम हवाई वाहतूक क्षेत्र व पर्यटनावर पडत आहे.
भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रव त्याच्या पूरक क्षेत्रातील सुमारे २९ लाख ३२ हजार ९०० नोकऱ्या यामुळे प्रभावित होण्याची भीती आहे. कोरोनामुळे देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान उड्डाणे महिन्याभरापासून बंद आहेत. लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर लावण्यात आलेले हे निर्बध कधीपर्यंत कायम राहतील याबाबत अनिश्चितता आहे. या कालावधीत ज्या प्रवाशांनी हवाई वाहतुकीसाठी तिकीट आरक्षित केले होते त्यांना तिकीटाचा पूर्ण परतावा द्यावा लागत असल्याने व सरकारने पुढील आदेश येईपर्यंत तिकीट आरक्षित करु नये असे निर्देश दिलेले असल्याने सध्या हवाई वाहतुकीचे आरक्षण बंद आहे.
हवाई वाहतूक क्षेत्र आतापर्यंतच्या सर्वात जास्त संकटकाळातून मार्गक्रमण करत आहे. भारतातून हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना या कालावधीत तब्बल ८५ हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील एका नोकरीला जोडून प्रवास व पर्यटनाशी संबंधित २४ नोकऱ्या संलग्न असतात त्या सर्वांना या परिस्थितीचा फटका बसणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तब्बल ४७ टक्के प्रवासी घट होण्याची शक्यता आहे.आशिया पॅसिफिक विभागात मोठ्या लोकसंख्येमुळे हवाई वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. कोरोनाचा फटका बसल्याने या विभागात यंदा मोठे नुकसान होण्याची भीती आहे.