कोरोनाचा बागुलबुवाच जास्त; मृत्यूदर ३ टक्के- आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:16 AM2020-03-05T04:16:07+5:302020-03-05T04:16:16+5:30
कोरोनात मृत्यूदर अडीच ते तीन टक्केच असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई : कोरोना व्हायरसबाबत जितका बागुलबुवा उभा केला जात आहे, तितका धोका नाही. यापूर्वी पसरलेल्या चिकन गुनिया, स्वाईन फ्लूसारख्या रोगात मृत्यूदर दहा टक्केपर्यंत होता. तर, कोरोनात मृत्यूदर अडीच ते तीन टक्केच असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
कोरोना व्हायरसबाबत सभागृहात सकाळच्या विशेष सत्रात नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा झाली. त्यात टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केलेल्या उपययोजना आणि नागरिकांनी घ्यायच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. कोरोना व्हायरसचा नेमका उगम अद्याप समजलेला नाही. मात्र हा प्राणीजन्य व्हायरस असल्याचा अंदाज लावला जात आहे. या विषाणू संक्रमणावर अद्याप औषध आणि लस उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, स्वच्छता ठेवणे हाच त्यावर प्रतिबंधक उपाय आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांनी जरा जास्त काळजी घ्यायला हवी, असे आरोग्यमंत्र्यानी सांगितले.
शिंकलो, खोकलो तर त्यातून हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो. रुग्णाशी हस्तांदोलन केल्यास कोरोनाची लागण होऊ शकते. सर्दी, खोकला याबाबत जे आपले एटिकेट्स आहेत, त्याप्रमाणे शिंकल्यानंतर रुमाल वापरला पाहिजे. १0४ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करुन दिला आहे. पुण्यात कंट्रोल रुम स्थापन केले आहे. मास्कची साठेबाजी आणि वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येईल, असे मंत्री टोपे यांनी सांगितले. सर्वांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. जे बाधित आहेत किंवा बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाºया व्यक्तिंनी मास्क वापरावा. एम ९५ हा मास्क तर लोकांनी वापरण्याचा विषयच नाही. ट्रिपल लेयर मास्क हा देखील बाधित झालेल्या रुग्णासाठीच आहे. इतर लोकांनी साधा रुमाल जरी रोज धुवून वापरला तरी चालेल, असे टोपे म्हणाले.
>अफवा पसरविल्यास कडक कारवाई
कोरोनाबाबत समाज माध्यमात अफवा पसरवल्या जात आहेत. कोणी म्हणते चिकन खाल्यावर होतो, कोणी म्हणतो फळ विशेषत: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यावर कोरोना होतो. समाजमाध्यमात अशा अफवा पसरविल्या जात आहेत.
अशा मेसेजेसला आळा घालण्यासाठी सायबर क्राईमच्या महासंचालकांशी चर्चा झाली आहे. अशा मेसेजच्या मुळाशी जाऊन अफवा पसरविणाºयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.