मुंबई : पुनश्च हरिओम म्हणत राज्यातील व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरू करण्यासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही सिनेमागृहे सुरू झाली तरी पुढील दोन महिने तेथे जाण्याची फक्त सात टक्के प्रेक्षकांचीच तयारी आहे. लाॅकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जागा ओटीटी प्लॅटफाॅर्मनी घेतली आहे. त्यामुळे भविष्यात मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सचे भवितव्य खडतर असल्याचे सांगितले जात आहे.केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील सिनेमागृहे सुरू करण्यात आली, तर महाराष्ट्रासह तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, छत्तीसगड आदी राज्यांनी मात्र सिनेमागृहांचे दार अद्याप उघडलेले नाही. जेथे सिनेमागृहे सुरू झाली तेथे प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या संस्थेने प्रेक्षकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून ही माहिती पुढे आली. जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ७२ टक्के लोकांनी सिनेमागृहे सुरू करू नयेत, असे मत मांडले होते. ऑगस्ट महिन्यात ते प्रमाण ७७, तर ऑक्टोबरमध्ये ७४ टक्के असल्याचे हा अहवाल सांगतो.लाॅकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जागा ओटीटी प्लॅटफाॅर्मनी घेतली आहे. त्यामुळे भविष्यात मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सचे भवितव्य खडतर आहे.
मल्टिप्लेक्स थिएटर्स सुरू केली तर पुढील ६० दिवसांत काय कराल ? ७४ टक्के - सिनेमागृहांमध्ये जाणार नाही. ४ टक्के - नवा सिनेमा आला तरच जाऊ. ३ टक्के - नवा-जुना कोणताही सिनेमा बघू. २ टक्के - नक्की सांगता येत नाही. १७ टक्के - थिएटरमध्ये सिनेमा बघतच नाही.