Join us

कोरोनाचा फटका, एसटी महामंडळाची २४०० कोटींची देणी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:08 AM

मुंबई : कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे, एसटीचे स्पेअर पार्ट, डिझेल ...

मुंबई : कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे, एसटीचे स्पेअर पार्ट, डिझेल अशा खर्चाचे एकूण २४०० कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. जर पुरवठादारांची देणी दिली नाही तर एसटीच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिझेल, स्पेअर पार्टची देणी थकल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसू शकतो. राज्यात काही आगारात डिझेलअभावी एसटी वाहतुकीला अडचणी आल्या होत्या.

गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सगळं आर्थिक चक्र ठप्प झाले होते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही राज्य सरकारला निधी द्यावा लागला होता. परंतु, सध्या राज्य सरकारलाही अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी एसटीचे उत्पन्न सात ते आठ हजार कोटी होते. गेल्यावर्षीचे उत्पन्न ३१०० कोटींवर आले आहे. गेल्या वर्षी मजुरांची वाहतूक, अत्यावश्यक सेवेची वाहतूक, मालवाहतूक याचा फायदा एसटीला झाला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २७० कोटी लागतात, पण एसटीचे दररोजचे उत्पन्न २ कोटींवर आले आहे. दरवर्षी ३६०० कोटी वेतनासाठी लागतात; पण गेल्यावर्षी ३१०० कोटी उत्पन्न झाले असले तरी यावर्षी हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारने मदत करायला हवी

राज्याच्या सर्वांगीण विकासात एसटीचा मोठा वाटा आहे. आजपर्यंत विविध करांच्या रूपात ७० वर्षांत करोडो रुपये राज्य व केंद्र शासनाला एसटीने दिले आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे एसटीला आर्थिक मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असून ते सरकारने पार पाडले पाहिजे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

-------------------