मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत यूनिट नंबर २२ मध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. येथील दाट वस्तीमध्ये हा रूग्ण सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तिची तपासणी करण्यात आली. शनिवारी आलेल्या अहवालात या व्यक्तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. अखेर तत्काळ पालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेत डॉक्टरांची टीम घटनास्थळी दाखल होत रूग्णाला रूग्णवहिकेद्वारे अंधेरीतील सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना बाधित रूग्णाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रूग्णाला कोरोना विषाणूची लागण कोणत्या कारणामुळे किंवा कुठून झाली याबाबतचा तपास पालिकेच्या डॉक्टरांमार्फत सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रूग्ण हा परदेशी किंवा इतर राज्यात गेला नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला परिसर पालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिसांनी सील केला. पोलिसांनी कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक होऊ नये, यासाठी लोकवस्तीतील तीन चाळीतील मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आरेवासीयांनी घरात थांबून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आरे पोलिसांनी केले आहे.