Join us

कोरोनाची परिस्थिती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 6:17 PM

रुग्णांना मिळणाऱ्या उपचाराचा कालावधी कमी करणे गरजेचे 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी  पश्चिम या भागांना जोडणारा सुमारे 10.50 लाख लोकसंख्येचा के पश्चिम हा मोठा वॉर्ड आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन पासून अनेक नामवंत सेलीब्रिटी, गर्भश्रीमंत व उच्चभ्रू नागरिक,मध्यमवर्गीय तसेच झोपडपट्टीवासीय, मुंबईचे भूषण असलेली जुहू चौपाटी, 8 जून 2014 साली वर्सोवा ते घाटकोपर या मार्गाला जोडणारी मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे, मासेमारीत प्रसिद्ध असलेला वेसावे कोळीवाडा या वॉर्डमध्ये मोडतो.

पश्चिम उपनगरातील के पश्चिम वॉर्डने कोरोना रुग्णांचा 10000 चा आकडा गेल्या आठवड्यात पार केला असून आर मध्य(बोरिवली),के पूर्व(विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व व जोगेेश्वरी पूर्व),पी उत्तर(मालाड पूर्व व मालाड पश्चिम) या तीन वॉर्डने सुद्धा 10000 चा टप्पा आधीच पार केला आहे. दि,21 सप्टेंबर रोजी के पश्चिम वॉर्डमध्ये आतापर्यंत 10348 कोरोना रुग्ण असून  7712 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून उपचारा दरम्यान 522 नागरिकांचा मृत्यू झाला.तर 2114 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल एका दिवसात आढलेल्या  एकूण 143 कोरोना रुग्णांपैकी इमारतींमध्ये 134 कोरोना बाधीत तर झोपडपट्टीत फक्त 9 कोरोना रुग्ण आढळून आले.

लोकमत ऑन लाईन व लोकमतच्या अंकात या चार वॉर्डने 10000 चा आकडा पार केल्याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी काल दुपारी के पश्चिम वॉर्डला भेट देऊन येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा कमी करता येईल याबद्धल के पश्चिम वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर विश्वास मोटे आणि त्यांच्या टीमशी सुमारे एक तास सविस्तर चर्चा करून येथील कोरोनाच्या वाढत्या संख्येबद्धल चिंता व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी पश्चिम उपनगरातील व मुंबईतील कोरोनाच्या स्थितीबद्धल सविस्तर चर्चा केली. के पश्चिम वॉर्डच्या भेटी बद्धल लोकमतला सविस्तर माहिती देतांना डॉ.दीपक सावंत म्हणाले की,येथील ओशिवरा,लोखंडवाला,जेव्हीपीडी,वर्सोवा -यारी रोड या भागातील प्रामुख्याने इमारतींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले.

कोरोना रुग्णांची लक्षणे आढळल्यावर टेस्टिंग,रिपोर्टिंग आणि रुग्णांला हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू होण्यास जो वेळ लागतो तो कालावधी कमी करणे आणि टेस्टिंग व कम्युनिटी स्क्रिनिंग वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीला उतरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या भागातील फेरीवाले व दुकानदार यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे असून इमारतीत राहणारे 5  ते 10 टक्के नागरिक हे कोरोना चाचणी करण्यासाठी उत्साही नसतात किंवा नकार देतात,त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब व माझी जबाबदारी ही संकल्पना या वॉर्डमध्ये उत्तम प्रकारे राबावली जात असून फॅमिली डॉक्टरांना या अभियानात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच येथील फेरिवाले,दुकानदार व नागरिकांनी सतत  मास्क लावणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकालॉकडाऊन अनलॉक