कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:44+5:302021-06-25T04:06:44+5:30

मुंबई - कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेतही आता मिळायला लागले आहेत. तिसऱ्या लाटेला कारणीभूत ...

Corona's Delta Plus raises concerns | कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढविली चिंता

कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढविली चिंता

Next

मुंबई - कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेतही आता मिळायला लागले आहेत. तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळले आहेत. नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे याबाबत तपास सुरू आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अजून वाढू शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशात कोरोनाचे जे म्युटेशन सापडले होते त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाली होती. या म्युटेशनला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरियंट नाव दिले होते, पण आता या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झाल्यामुळे डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे अद्याप डेल्टा प्लस ''Variant of Concern'' म्हणजे काळजी करण्याजोगा व्हेरियंट नसल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

डेल्टा व्हेरियंटमुळे दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूची तीव्रता अधिक होती. त्यामुळे या व्हेरियंटच्या संसर्गाची तीव्रता रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना आखल्या आहेत. आरोग्य सुविधांसह नियमांच्या काटेकोरपणे अंमलबजावणीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

डेल्टा प्लसच्या व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या भारतीय लसी किती परिणामकारण ठरतात हे तपासण्यासाठी संशोधनाची गरज आहे. कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हायरस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. "डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला. ''डेल्टा प्लस'' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेले K417N म्युटेशनदेखील आढळून आल्याची माहिती विषाणूतज्ज्ञ डॉ सागर केणी यांनी दिली.

कोरोनाचे एकूण रुग्ण ७२३३२४

बरे झालेले रुग्ण ६९११२८

एकूण मृत्यू १५३८८

सक्रिय रुग्ण १४५७७

जनुकीय तपासणी गरजेची

आरटीपीसीआर तपासणी करून रोगनिदान करणे शक्य आहे का, तसेच सध्याचा औषधोपचार बदलणे गरजेचे आहे का, यासाठी ही तपासणी केली जाते. लसीकरणामुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती पुरेशी आहे का, रोगाच्या लक्षणांमध्ये, तसेच रोगप्रसाराच्या पद्धतीमध्ये काही बदल आहे का, विषाणू किती घातक झाला आहे, नवीन लस तयार करण्याची गरज भासणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही जनुकीय अभ्यासातून मिळू शकतात. त्यामुळे या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सात हजार ५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांची जनुकीय तपासणी करण्यात येणार आहे.

दैनंदिन चाचण्यांच्या क्षमतेत वाढ

नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दैनंदिन चाचण्यांच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावल्यानंतर दिवसभरात सोमवारी ३० हजार चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र, नव्या म्युटेशनच्या नंतर पालिकेने खबरदारी घेऊन चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता पालिकेने शहर उपनगरात दिवसाला ५० हजार चाचण्या करण्याचे ठरविले आहे. नागरिकांची अधिक वर्दळ असणाऱ्या भागात झोपडपट्ट्या आणि निवासी वसाहतींमध्ये चाचण्या वाढवण्यात येणार आहेत.

.................................................

Web Title: Corona's Delta Plus raises concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.