मुंबईत कोरोनाचा विळखा सुटतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:55+5:302021-07-27T04:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असून, मुंबईत मोठी रुग्णघट नोंदविण्यात येत आहे. मुंबईत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असून, मुंबईत मोठी रुग्णघट नोंदविण्यात येत आहे. मुंबईत सोमवारी २९३ रुग्ण आढळले, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील काही महिन्यांच्या तुलनेत पहिल्यांदाच मुंबईच्या रुग्णसंख्येत एवढी मोठी घट नोंदविण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ५००च्या खाली नोंदवली जात आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सोमवारी मुंबईत ५०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर आतापर्यंत ७ लाख १० हजार ८४९ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. शहर उपनगरात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून १३२४ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. १९ ते २५ जुलैदरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे.
सध्या मुंबईत ५ हजार ३९७ रुग्ण उपचाराधीन आहेत. झोपडपट्टीतील संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, दिवसभरातील आकडेवारीनुसार, शहरात ३ चाळी आणि ६० इमारती प्रतिबंधित आहेत. दरम्यान, मुंबईत पाचवे सेरो सर्वेक्षण सुरू झाले असून, त्यात शहरातील सुमारे आठ ते दहा हजार व्यक्तींचे नमुने घेण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २४ हजार ९८९ चाचण्या करण्यात आल्या आहेत तर आतापर्यंत एकूण ७९ लाख ९० हजार ३१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.