मनोहर कुंभेजकर
मुंबई : वेसावे कोळीवाड्यात एका ६० वर्षीय नागरिकाचा काल रात्री उशिरा कोरोनाने मृत्यू झाला. येथे कोरोना रुग्णांची संख्या आता ४० च्या आसपास झाली असून, के पश्चिम वॉर्ड मध्ये सुद्धा रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून काल रात्री येथील कोरोना रुग्णांची संख्या ४२१ झाली होती. पश्चिम उपनगरातील पालिकेच्या ९ वॉर्ड पैकी सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या आणि हॉटस्पॉट झालेल्या के पश्चिम वॉर्डकडे पालिकेने गंभीर्यने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. येथील रुग्णास जोगेश्वरीच्या ट्रामा सेंटर मध्ये दि,२७ रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान काल रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याने वेसावे कोळीवाड्यात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून नोंद असलेल्या वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच असल्याने येथील कोळी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची रोज वाढती संख्या लक्षात घेता येथील हॉटस्पॉटच्या ठिकाणी मास स्क्रिनिग व फिव्हर स्क्रिनिगची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिल्यास संशयित कोरोना रुग्णाला शोधून त्यांचे अन्य ठिकाणी लगेच क्वारंटाईन करता येईल. यासाठी पालिका प्रशासनाकडून तातडीने पावले उचलून क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करून देणे, जलद कोरोना टेस्टिंग प्रणाली कार्यन्वित करणे, अँम्ब्युलन्सची उपलब्धता करून देणे याकडे जातीने लक्ष देणे, के पश्चिम वॉर्डमध्ये रुग्णांलयाची पुरेशी संख्या उभी करून कोरोना रुग्णांना लवकर बेड उपलब्ध करून देणे याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पत्र नुकतेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच दिले होते, अशी माहिती येथील स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी दिली. लोकमतने देखिल येथील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्धल या संदर्भात सुरवातीपासून सातत्याने वृत्त दिले आहे.
वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि,११ ते १३ एप्रिल व दि,२४ ते २६ एप्रिल दरम्यान दोन वेळा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व राजहंस लाकडे यांनी दिली. तर येथील कोळी बांधवांची घरोघरी जाऊम कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. तसेच येथे पालिकेचा एकच डॉक्टर कार्यरत असून येथे डॉक्टरांची संख्या वाढवून क्वारंटाईन सेंटर्स आणि इतर गरजेच्या सुविधा लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी सांगितले.