मुंबई : राज्यात शुक्रवारी एकूण ३९ हजार ९२३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५३ लाख ९ हजार २१५ झाली आहे. तर, दिवसभरात ५३ हजार २४९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ४७ लाख ७ हजार ९८० जण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या एकूण ५ लाख १९ हजार २५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
अलीकडच्या काळात प्रथमच दैनंदिन रुग्णांचा आकडा ४० हजारांहून कमी झाला आहे. नव्या बाधितांच्या संख्येचा उतरता आलेख सकारात्मक बाब असल्याचे मानले जात आहे. तर, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के एवढे झाले आह, तर, दिवसभरात ६९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत ७९ हजार ५५२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६ लाख २ हजार १४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३ लाख ९ हजार २१५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४ लाख ८२ हजार ४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८ हजार ३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.