नौदलाच्या युद्धसाहित्य निर्मितीत कोरोनाचा खो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:38+5:302021-05-05T04:09:38+5:30
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा; अनेक प्रकल्पांचे काम धीम्या गतीने लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नौदलाच्या युद्धसाहित्य निर्मितीलाही कोरोनाचा फटका बसला ...
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा; अनेक प्रकल्पांचे काम धीम्या गतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नौदलाच्या युद्धसाहित्य निर्मितीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आल्याने माझगाव डॉकमधील अनेक प्रकल्पांचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत युद्धनौका आणि पाणबुड्यांचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
भारतीय नौदलासाठी युद्धसाहित्याची निर्मिती करणारी माझगाव डॉक ही प्रमुख कंपनी आहे. त्यांनी आजवर नौदलाला सर्वाधिक युद्धनौका आणि पाणबुड्या पुरवल्या आहेत. सध्या दोन विनाशिका, चार फ्रिगेट्स आणि एका पाणबुडीची उभारणी सुरू आहे. नौदलाच्या जुन्या शिशुमार श्रेणीतील पाणबुड्यांचे दुरुस्ती कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आल्याने ही सर्व कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत.
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात माझगाव डॉकमधील काम दोन महिने पूर्णतः बंद होते. त्यानंतर अत्यंत कमी मनुष्यबळात काम सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब झाला. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या कामाने वेग घेतला. परंतु, पुन्हा कोरोनाचा जोर वाढल्याने या प्रकल्पांची गती मंदावल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, माझगाव डॉकशी संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
* ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरू
पहिल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश प्रकल्पांना सहा ते आठ महिन्यांचा विलंब झाला. आता दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा अडथळे आले आहेत. सुरुवातीला केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांना बोलावले जात होते. परंतु, प्रकल्पांना आणखी विलंब होऊ नये यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरू करण्यात आले आहे. ५० टक्के कर्मचारी पहिले तीन दिवस आणि उर्वरित ५० टक्के कर्मचारी पुढील तीन दिवस कामावर येतात. आठवड्यातून सहा दिवस काम चालते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
---------------------------------