कोरोनाच्या चाचण्या पुन्हा वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:05 AM2021-05-23T04:05:03+5:302021-05-23T04:05:03+5:30
पालिका प्रशासन; संसर्गाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुसऱ्या लाटेनंतर आता मुंबईतील काेराेनाचा प्रादुर्भाव कमी ...
पालिका प्रशासन; संसर्गाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुसऱ्या लाटेनंतर आता मुंबईतील काेराेनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून पालिकेने शहर, उपनगरात दिवसाला ३५ ते ४५ हजार कोरोनाच्या चाचण्या केल्या. मात्र मागील दोन आठवड्यात दैनंदिन चाचण्यांमध्ये घट झाल्यामुळे पॉझिटिव्हीचे प्रमाण १० टक्क्यांच्या खाली आले आहे. परंतु, आता पुन्हा पालिकेने दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून मुंबईतील संसर्गाची स्थिती समोर येणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील २० दिवसांत ५ लाख २४ हजार ३४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. म्हणजेच, दिवसाला सरासरी २७ हजार ५९७ चाचण्या झाल्या. एप्रिलच्या मध्यावर या दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण दिवसाला ५० हजार इतके होते. यात मोठी घट होऊन हे प्रमाण आता २० ते २५ हजारांवर आले आहे.
कठोर निर्बंधांमुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र आता संसर्गाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पुन्हा दैनंदिन चाचण्या वाढविण्यात येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, शहर, उपनगरातील काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली येत नाही तोपर्यंत चाचण्यांचे प्रमाण अधिक ठेवले पाहिजे.* शिवाय, रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्यासाठी घाई करायला नको. ज्या विभागांत सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, तिथे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोध, चाचण्यांवरही भर दिला पाहिजे.*
* रुग्ण कमी झाल्याने लाट आटाेक्यात आली असे म्हणता येणार नाही!
मुंबईतील रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाले असले तरी दुसरी लाट आटोक्यात आली असे म्हणता येणार नाही. यापूर्वी आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण व अँटिजन चाचण्यांचे प्रमाण ६०-४० टक्के असे होते, सध्या ते ७०-३० टक्के असे आहे. दैनंदिन चाचण्यांत ३५-४० टक्के प्रमाण अँटिजन चाचण्यांचे असते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
..................................................