कोरोनाचा ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना बसणार १० हजार कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 02:07 PM2020-03-25T14:07:39+5:302020-03-25T14:09:51+5:30
कोरोनामुळे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतींचे काम पुढील पाच ते सहा महिने लांबणीवर जाणार असल्याने आता या क्षेत्राला सुमारे १० हजार कोटींचा फटका बसणार आहे. तसेच आजच्या गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर देखील एकही फ्लॅट विकला गेलेला नाही.
ठाणे : आधीच मंदी आणि नोटीबंदीनंतर अद्यापही बांधकाम व्यावसायिक स्थीरस्तावर होऊ शकलेला नाही. अशातच आता कोरोना व्हायरसचा फटका या व्यावसायालाही तीव्र स्वरुपात बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील २ हजार इमारतींचे बांधकाम पूर्णपणे थांबले असून गुढीपाडव्याचा मुहुर्तही कोरोनामुळे लांबला आहे. त्यामुळे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना सुमारे १० हजार कोंटीचा फटका बसल्याची माहिती एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना आधीच मंदी नोटीबंदीमुळे सावरलेल नाहीत. त्यात आता कोरोनाचा व्हायरसचा फटका या व्यावसायाला बसला आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अनेक जण आपल्या नव्या घराचे स्वप्न साकार करीत असतो. शिवाय या मुहुर्तावर बांधकाम व्यावसायिक देखील विविध प्रकारच्या योजना पुढे आणत असतात. त्यामुळे ग्राहकही आर्कषित होत असतो. मागील वर्षी याच मुहुर्तावर ठाण्यात एकाच दिवशी १५०० च्या आसपास घरांचे बुकींग झाले होते. यंदा मात्र याच दिवशी एकाही घराचे बुकींग झालेले नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे कोणीही घराबाहेर पडलेला नाही. तसेच बांधकाम व्यावसायिकांचे आॅफीस देखील बंद आहेत. परंतु मागील काही दिवसापासून कोरोनाचे सावट वाढल्याने १५ मार्चच्या आसपासपासून शहरातील सुमारे २ कोटी स्केअरफुटाचे सुमारे २ हजार इमारतींचे बांधकाम थांबले आहे. तर आजच्या गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर २ हजाराहून अधिक ग्राहक हे फ्लॅटचा ताबा घेणारे होते. परंतु त्यांचे स्वप्न देखील आता लांबणीवर पडले आहे.
केवळ हीच बाब नाही तर आता कामगार वर्ग देखील आपआपल्या गावी निघून गेला आहे. कोरोनाचे सावट केव्हा कमी होईल हे माहित नाही. परंतु आता एप्रिल आणि मे महिना देखील त्यात जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कामगार वर्ग मे अखेरच येईल असे दिसत आहे. परंतु त्यानंतर लागलीच पावसाळा सुरु होणार आहे. या काळात काम करता येत नाही. त्यामुळे पुढील पाच ते सहा महिने काम थांबणार असल्याचे सध्या तरी दिसत असल्याचे एमसीएचआयचे ठाणे यांच्या सदस्यांचे म्हणने आहे. एकूणच या सर्वामुळेच ठाण्यातील बांधकाम व्यावसायाला तब्बल १० हजार कोटींचा फटका बसणार असल्याचेही दिसत आहे.
आता कुठे आम्ही सावरायला लागलो होतो, परंतु कोरोनामुळे पुन्हा मोठे नुकसान आम्हाला सहन करावे लागणार आहे. पुढील पाच ते सहा महिने काम ठप्प होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार केल्यास सुमारे १० हजार कोटींचा फटका आमच्या व्यावसायाला बसेल अशी चिन्हे आहेत.
(जितेंद्र मेहेता - उपाध्यक्ष -एमसीएचआय, ठाणे)