मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधीची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहे, अशी माहिती राज्य सरकार व मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.
कोरोना व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाटा, ऑक्सिजन, औषधे व कोरोना संदर्भातील अन्य संसाधनांचे योग्य प्रकारे वाटप करण्यात यावे, अशी मागण्या करणाऱ्या काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि भविष्यात ओमायक्रॉनचे परिणाम हाताळण्यास प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया व मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी खंडपीठाला दिली.
''राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के नियंत्रणात आहे. तसेच ते भविष्यात परिस्थिती हाताळण्यास सुसज्ज आहेत,'' असे न्यायालयाने म्हटले. ''तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉन हा डेल्टाप्रमाणे प्राणघातक नाही, पण त्याचा संसर्ग वेगाने होत आहे,'' असेही न्यायालयाने म्हटले.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढली होती. मात्र, आता रुग्णसंख्येत घट झाली आहे. आतापर्यंत रुग्णालयांवर ताण पडलेला नाही. यंत्रणा उपलब्ध आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने याचिकेवरील पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी ठेवली.
राज्यात २४ हजार ९४८ कोरोनाबाधितांची नोंद-
राज्यभरात शुक्रवारी २४ हजार ९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ७६ लाख ५५ हजार ५५४ झाली आहे. तर, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५८६ आहे. राज्यभरात शुक्रवारी ४५ हजार ६४८ कोविड रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७२ लाख ४२ हजार ६४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत; तर, आजच्या १०३ जणांच्या नोंदीसह आतापर्यंतच्या मृतांचा आकडा १ लाख ४२ हजार ४६१ आहे. शुक्रवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४१ लाख ६३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६ लाख ५५ हजार ५५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ६१ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. ३ हजार २०० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहर उपनगरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात-
मुंबईत बुधवारी पॉझिटिव्हिटी दर ४.३ टक्के असल्याची नोंद होती. मात्र मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्ण निदान घटल्याने उपचाराधीन रुग्णांचा आलेखही घसरला आहे. शहर उपनगरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने आता तिसरी लाट ओसरत असल्याची दिलासादायक स्थिती आहे. शहर उपनगरात गुरुवारी ३.२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. हे मुंबई शहर जवळजवळ पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण आहे, असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले. प्रशासनाने दिली आहे.