कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:21+5:302021-09-03T04:06:21+5:30

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मुंबईकरांनी दोन्ही लाटेमध्ये चांगले सहकार्य केले आहे. त्याच पद्धतीने सहकार्य ...

Corona's third wave on the threshold; Celebrate Ganeshotsav by following the rules | कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा

Next

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मुंबईकरांनी दोन्ही लाटेमध्ये चांगले सहकार्य केले आहे. त्याच पद्धतीने सहकार्य करून नियम पाळून गणेशोत्सव साजरा करूया, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ, महापालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालय येथे महापौरांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी किशोरी पेडणेकर बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नोडल अधिकाऱ्यांनी दुपारी तीन ते पाच या वेळेत विभाग कार्यालयात उपस्थित राहून गणेश मंडळांच्या परवानगीची सर्व कामे पूर्ण करण्यास सहकार्य करावे. गणेशाच्या आगमनापूर्वी खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावे. वाहतूक सुरळीत ठेवून आगमन व विसर्जन व्यवस्थित व्हावे म्हणून योजना कराव्यात. धोकादायक उड्डाणपुलांवरून ये-जा होणाऱ्या गणेशमूर्तींबाबत दुर्घटना होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. मंडळांनी मंडपासाठी केलेले खड्डे बुजवावेत. डेंगू, मलेरियाची साथ लक्षात घेता मंडळाच्या ठिकाणी महापालिकेने दिवसातून तीन वेळा धूरफवारणी करावी.

सभागृह नेते विशाखा राऊत म्हणाल्या, विभाग कार्यालयात गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी नेमणूक करण्यात आलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांनी आपला भ्रमणध्वनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना द्यावा. जेणेकरून मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सोयीचे होईल.

Web Title: Corona's third wave on the threshold; Celebrate Ganeshotsav by following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.