कोरोनाच्या काळात खाकीतील योद्धा गाण्यातून करतोय जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:05 AM2021-05-26T04:05:52+5:302021-05-26T04:05:52+5:30

मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या काळात हातात माईक घेत बांगुरनगर पोलीस ठाण्याचे मनोजकुमार हनुमंत क्षीरसागर हे ...

In Corona's time, the khaki warrior is raising awareness through songs | कोरोनाच्या काळात खाकीतील योद्धा गाण्यातून करतोय जनजागृती

कोरोनाच्या काळात खाकीतील योद्धा गाण्यातून करतोय जनजागृती

Next

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात हातात माईक घेत बांगुरनगर पोलीस ठाण्याचे मनोजकुमार हनुमंत क्षीरसागर हे गाण्यातून जनजागृती करताना दिसत आहेत. समाजात सर्वत्र नकारात्मक असलेल्या वातावरणात मनोज यांनी आपल्या छंदातून ऊर्जा मिळविण्याचा निर्धार केला आहे. संघर्षाच्या काळात कर्तव्य बजावत असताना दुसरीकडे गायनाची कला जोपासत दृष्टिकोन सकारात्मक असला की 'जिंदगी गुलजार हैं' ही उक्ती खरी ठरवलीय.

कल्याणला राहणारे मनोज कोरोनाच्या पहिल्या लाटेत रोज ५० किमीच अंतर दुचाकीवरून पार करत मालाड पश्चिमेला असलेले बांगुरनगर पोलीस ठाणे गाठायचे. दिवसाला १०० किलोमीटरचा टप्पा ठरलेला. घरात पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कोथळे या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले मनोज यांना शाळेत असल्यापासून संगीताची आवड आहे. गावाकडे रेडिओवर गाणी ऐकून ते गाणी गात असत. पुढे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान विविध स्पर्धांमधून आपली आवड जोपासली.

या क्षेत्रात करिअर करण्याची धडपड सुरू असतानाच २०१० मध्ये पोलीस दलात नोकरी मिळाली. कर्तव्य, कुटुंब जबाबदारीतूनही त्यांनी आपली कला जिवंत ठेवली. विविध ऑनलाइन रिॲलिटी शोमध्ये त्यांनी सहभाग घेत पारितोषिकेही पटकावली आहेत. या संकटातही बंदोबस्तादरम्यान आपल्या गाण्यातून ते जनजागृती करत आहे.

मिळालेला वेळ सत्कर्मी लावणे गरजेचे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांचे कार्य सुरू आहे. सध्या लोकलने ये-जा सुरू आहे. अशात बॅगेत छोटा माईक असतोच, प्रवासात त्यांची गायनाची प्रॅक्टिस सुरू असते, तर ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी ते गाण्यातून जनजागृती करत नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देतात. ते सांगतात, प्रत्येकाने ठरवले तर ते काहीही करू शकतात. कोरोनाच्या काळात मिळालेला वेळ सत्कर्मी लावणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत. तुम्ही घरी राहून सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: In Corona's time, the khaki warrior is raising awareness through songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.