CoronaVaccine: ...अन्यथा लसीकरण केंद्रच होईल संसर्गाचा केंद्रबिंदू; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:28 AM2021-04-29T07:28:13+5:302021-04-29T07:30:06+5:30
१ मेपासून सुरू हाेणाऱ्या माेहिमेत लस घेण्यासाठी गर्दी हाेण्याची भीती
मुंबई : राज्यात १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचा टप्पा सुरू होणार आहे. राज्य किंवा मुंबईतील लसीकरणाची यंत्रणा पाहता यंत्रणेच्या तुलनेत लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. केंद्रावर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रांवर होणाऱ्या गर्दीतूनच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत याठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसे न झाल्यास लसीकरण केंद्र संसर्गाचा केंद्रबिंदू होतील, असा धोका राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
येत्या १ मेपासून १८ वर्षांपासून पुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. याचा विचार करता मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रावर गर्दी होणार आहे, यासाठी योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यामध्ये लसीचा पुरवठा वाढविणे, प्रत्येक येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करणे, होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणे, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे, सामाजिक संस्थांची मदत घेणे, अन्य सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र)चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मांडले.
लसीकरण आणि बाधितांची संख्या वाढणे याचा थेट संबंध नसला तरी लसीकरणाच्या वेळी काळजी घेण्याची गरज आहे. अलीकडेच एका व्यक्तीला लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ताप आला. लसीकरणानंतर ताप येतोच म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तो ताप कोरोना प्रादुर्भावाचा होता. अशीच आणखीही काही उदाहरणे आहेत. लसीकरण झाल्यानंतर लगेच तीन-चार दिवसांत कोरोना संसर्ग होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांचा लसीकरणाविषयी गैरसमज होऊ लागला आहे, तो वेळीच दूर करणे महत्त्वाचे असल्याची सूचना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी केली.
लसीची सहज उपलब्धता महत्त्वाची
लस घेतेवेळी संबंधित व्यक्ती लक्षणे नसलेली कोरोनाबाधित असेल तर ते लक्षात येणार नाही, अशा व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. या भीतीमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी होऊ शकते. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काेरोना झाल्याचे लक्षात आले आहे. मात्र, अशी उदाहरणे क्वचित आहेत. दोन्ही डोस घेऊनही ज्यांना संसर्ग होतो, त्यांच्या आजाराचे स्वरूप इतरांसारखे गंभीर राहात नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लस सर्वत्र कशी सहज उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले तरच केंद्रांवरील गर्दी टळू शकेल. - डॉ. शशांक जोशी, राज्य कोरोना टास्क फोर्स, सदस्य