Join us

CoronaVaccine: केवळ १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे आजपासून लसीकरण; महापालिकेच्या पाच केंद्रांवर मिळणार लस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 12:10 AM

CoronaVaccine: सध्यातरी लसीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केले. 

मुंबई - कोविड प्रतिबंधात्मक लसींचा मोजकाच साठा शुक्रवारी रात्री उशिरा महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे शनिवारपासून केवळ १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. पालिकेच्या पाच केंद्रांवर ही लस मिळणार असून कोवीन ॲपमध्ये नोंदणी असणे बंधनकारक आहे. तसेच सध्यातरी लसीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केले. 

लससाठा संपुष्टात आल्याने शुक्रवारपासून रविवार, दिनांक २ मे पर्यंत असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहील, असे पालिकेने गुरुवारी जाहीर केले होते. त्यामुळे १ मे पासून नियोजित १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा लसींचा मोजकाच साठा पालिकेला मिळाला आहे. त्यामुळे नियोजित मोहीम शनिवारी ठरल्याप्रमाणे होणार आहे.

भविष्यात लसींच्या मात्रांचा साठा प्राप्त झाल्यानंतर त्या-त्या वेळी लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान,  सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी  नियोजन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे

येथे होणार लसीकरण....

  • नायर रुग्णालय (मुंबई सेंट्रल)
  • राजावाडी रूग्णालय (घाटकोपर) 
  • कूपर रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम)
  • सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी )
  • वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर

 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका