मुंबई : नायर रुग्णालयात १०० व्या प्लाझ्मादानाची नोंद करण्यात आली आहे. प्लाझ्मादानाबाबत आता हळूहळू जागरूकता वाढत असताना बरे झालेले रुग्ण गंभीर आजार झालेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मादान करायला पुढे येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये कोरोना विषाणूविरोधात लढणारी प्रतिपिंडे तयार होतात. आतापर्यंत १०० हून अधिक जणांनी प्लाझ्मादानासाठी पुढाकार घेतला असून यात कोविड योद्ध्यांनीही सहभाग नोंदविला आहे.
मुंबईत यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. तीन महिन्यांनंतर नायर रुग्णालयात शुक्रवारी १०० वे प्लाझ्मादान पार पडले. डॉ. आंजनेय आगाशे हे १०० वे प्लाझ्मादाते ठरले. डॉ. आगाशे यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. एखादा रुग्ण बरा होऊन प्रत्येक पंधरवड्यातून एकदा प्लाझ्मादान करू शकतो. त्यानुसार, डॉ. आगाशे यांनी नायर रुग्णालयात जाऊन शुक्रवारी तिसऱ्यांदा प्लाझ्मादान केले.
आयसीएमआर चाचणीचा एक भाग म्हणून रुग्णालयातील ४० हून अधिक रुग्णांमध्ये प्लाझ्माचे संक्रमण करण्यात आले आहे. दात्यांच्या समुपदेशनासाठी पालिकेने एप्रिलमध्ये कोविड योद्धा आणि नंतर जूनमध्ये मुंबई धडकन या स्वयंसेवी संस्थेशी करार केला. कोविड योद्धाचे प्रमुख डॉ. स्वप्निल पारीख म्हणाले की, लोकांना समजावून सांगण्याबाबत काही अडचणी आहेत. पात्र दाते शोधण्यासाठी देणगीची आवश्यकता आहे. डॉ. पारीख हे राज्य शासनासोबत प्लाझ्मादात्यांच्या शोधार्थ काम करत आहेत. अन्य आजार असलेले, गर्भधारणेचा इतिहास, मधुमेह, उच्च रक्तदाब असलेले लोक दान करण्यासाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांना शोधून त्यांना प्लाझ्मादान करण्यासाठी तयार करणे हे आव्हान आहे.
शहरातील पहिले रुग्णालयनायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले की, बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण मोजण्यासाठी ‘सीएलआयए’ तंत्र वापरत आहोत. आयसीएमआर चाचणीचा भाग म्हणून प्लाझ्मा उपचार पद्धती सुरू करणारे नायर हे शहरातील पहिले रुग्णालय ठरले आहे. पालिकेने १७ एप्रिलला प्लाझ्मा काढण्यासाठी एफेरेसिस मशीन खरेदी केली आहे. स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने १०० दात्यांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला यश मिळाले आहे.