coronavirus: धारावीत १ हजार जणांना लागण, ४० जणांचा मृत्यू ; कोरोनाला रोखण्याचे पालिकेपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:21 AM2020-05-14T03:21:05+5:302020-05-14T03:22:19+5:30
जास्तीत जास्त लोकांची चाचणी, फिव्हर क्लिनिक आणि अडीच हजार कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असूनही दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोना रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
मुंबई : वरळी पॅटर्नमुळे जी-उत्तर विभागात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. त्याच वेळी धारावीमधील वाढत्या रुग्णसंख्येने टेन्शन वाढविले आहे. बुधवारी ६६ नवीन रुग्ण सापडल्यामुळे या परिसरातील रुग्णांचा आकडा १०२८वर पोहोचला आहे. तर ४० लोकांचा मृत्यू झाला आहे.
जास्तीत जास्त लोकांची चाचणी, फिव्हर क्लिनिक आणि अडीच हजार कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असूनही दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोना रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागाची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख एवढी आहे. गेल्या महिन्यात धारावीमध्ये एका दुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर या आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण झोपडपट्टीत वाढत गेला.
केंद्रीय पथकाने या परिसराची एप्रिल महिन्यात पाहणी केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार क्वारंटाइन कक्ष आणि चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले. मिशन धारावी आणि फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून बाधित झोपडपट्टीमध्ये नागरिकांना तपासण्यात येत आहे. सुमारे अडीच हजार पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, अभियंता, सफाई कामगारांचे पथक या विभागात तैनात आहेत.
मात्र येथील नागरिक मुंबई महापालिकेशी संपर्क साधत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने आता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांची मदत घेतली आहे. त्यानुसार अशा रुग्णांना विनंती करून क्वारंटाइन होण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, धारावीत गेल्या दहा दिवसांमध्ये रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.
मिशन धारावी...
धारावीमध्येही फिव्हर क्लिनिक आणि मिशन धारावीच्या माध्यमातून ४० हजार लोकांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ५० हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. दादर, माहीममध्येही रुग्ण वाढले... जी उत्तर विभागातील माहीम आणि दादर परिसरातील रुग्णांची संख्याही वाढत आहे. बुधवारी माहीममध्ये १२ नवीन रुग्ण सापडले. तर दादरमध्ये आठ कोरोनाबाधित आढळून आले. तर प्रत्येकी सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत काही झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना.. धारावीत काही रुग्ण हे दिल्लीत मरकजमध्ये सहभागी होऊन परतले होते. हे रुग्ण सुरुवातीला स्वत:हून पुढे आले नाहीत. मात्र, पालिका आणि पोलीस प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ते उपचारांसाठी पुढे आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आणि धारावीतील कोरोनाचा प्रसार वाढला, असे पालिकेतील सूत्रांकडून समजते. तसेच येथील झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंंग पाळणे शक्य होत नाही.
रेसकोर्स येथे ३०० खाटांचे विलगीकरण केंद्र
मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी एनएससीआय वरळी डोम येथील पाचशे खाटांच्या विलगीकरण कक्षास, तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वांद्रे-कुर्ला संकुल येथे उभ्या राहत असलेल्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालयास व वरळी रेसकोर्सवर उभ्या राहत असलेल्या अलगीकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली.
या आढावा दौऱ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त इक्बालसिंग चहल हेसुद्धा उपस्थित होते.
अस्लम शेख यांनी सांगितले की, वांद्रे-कुर्ला संकुल येथे उभ्या राहिलेल्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालय व एनएससीआय डोम येथील विलगीकरण कक्षाच्या धर्तीवर वरळी रेसकोर्सवरही तीनशे खाटांच्या विलगीकरण केंद्राची उभारणीही करण्यात येत आहे.
एन.एस.सी.आय. परिसरात लवकरच ४० खाटांचा कोविड-१९ समर्पित अतिदक्षता विभागही सुरू होणार आहे. अलगीकरण कक्ष व मॉड्युलर रुग्णालये यांच्या माध्यमातून कोरोना महामारीला आटोक्यात कसे आणता येईल, या अनुषंगाने पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली असल्याचे अस्लम शेख यांनी शेवटी सांगितले.