Join us

Coronavirus: राज्यात १२ हजार २९६ कोरोनाबाधित; दिवसभरात ७९० रुग्ण, तर ३६ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:57 AM

बळींचा आकडा ५२१वर । दिवसभरात १२१ जणांना डिस्चार्ज; आतापर्यंत २००० जण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय, लक्षणविरहित रुग्णांची संख्याही यात अधिक आहे. राज्यात शनिवारी ७९० कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ३६ मृत्यू झाले. यामुळे राज्यातील बाधितांची संख्या १२,२९६ झाली असून, बळींचा आकडा ५२१ झाला आहे. मुंबईत शनिवारी सर्वाधिक २७ मृत्यूची नोंद झाली आहे. या स्थितीत दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १२१ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत दोन हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतही सहवासितांचा शोध, घरोघरी तपासणी आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे.

मुंबईत शनिवारी ५४७ रुग्णांची नोंद झाली असून, रुग्णसंख्या ८ हजार ३५९ झाली आहे. तर दिवसभरात २७ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ३२२ झाला आहे. राज्यात शनिवारी झालेल्या ३६ मृत्यूंपैकी मुंबईतील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, वसई-विरार, अमरावती जिल्हा आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर पश्चिम बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक घरगुती अलगीकरणात असून १२ हजार ६२३ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.मातोश्रीजवळील ३ पोलिसांना कोरोनामुख्यमंत्र्यांच्या कलानगर परिसरातील मातोश्री बंगल्याजवळ बंदोबस्तावर असलेल्या तीन पोलिसांना कोरोना झाल्याचे शनिवारी समोर आले. मातोश्रीबाहेर कर्तव्यावर असलेल्या तिघांपैकी दोन पोलिसांनी शुक्रवारी रात्रपाळी करून घर गाठले, तर एक जण सकाळी ड्युटीवर रुजू झाला होता.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस