मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत जीव धोक्यात घालून पोलीस कार्यरत असताना, त्यांना आरामासाठी १२ तास सेवेनंतर २४ तास आरामाचा फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. मात्र हळूहळू विविध पोलीस ठाण्यांत १२ तास सेवा कायम ठेवत २४ तास आरामाचा फॉर्म्युला बंद होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तर धारावीतील ५५ वर्षीय पोलीस हवालदाराचा शनिवारी कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील आकडा ३८ वर पोहोचला आहे.
वाढत्या मृत्यूदरामुळे पोलिसांमध्ये अवस्थता असताना, पोलिसांना आराम मिळावा म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १२ तास सेवा आणि २४ तास आरामाचा नियम लागू केला. मात्र बऱ्याच ठिकाणी या पर्यायाला फुली मारत कर्मचाऱ्यांना १२ तास सेवा कायम ठेवून, २४ तास आरामाचा पर्याय बंद होत असल्याने पोलिसांच्या नाराजीत भर पडत आहे. मुंबईत रस्त्यावरील गुन्हे डोके वरकाढत असताना, पोलिसांवरचा ताण वाढला. त्यात रविवारपासून मुंबईत पुन्हा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे १२/२४ तासांचा पर्याय कायम ठेवावा, अशी मागणी पोलिसांकड़ून होत आहे.