- आशीष राणेवसई : मुंबईजवळ समुद्रात काही अंतरावरच ‘मरेल्ला डिस्कव्हरी-१’ या खासगी कंपनीच्या जहाजावर १३२ भारतीय प्रवासी नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना मुंबई बंदर प्राधिकरणाने ‘जैसे थे थांबा’ असा आदेश दिला आहे. दरम्यान, ‘काहीही करा, पण आम्हाला भारत देशाच्या जमिनीवर उतरवून सहकार्य करा, आम्हाला घरी परतायचे आहे, कुटुंबीयांना भेटायचे आहे,’ अशी आर्त साद या जहाजावरील भारतीय प्रवासी नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारला घातली आहे.देशात सर्वत्र लॉकडाउन घोषित झाल्यामुळे हे जहाज कोचीनवरून मुंबईत तर आले, मात्र २१ दिवसांपासून मुंबईजवळील १०० नॉटिकल अंतरावर त्यास पाण्यातच बंदर प्राधिकरणाने ‘जैसे थे’ उभे ठेवले आहे. ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या एनजीओमार्फत या भारतीय प्रवाशांनी केंद्र व राज्य सरकारकडे मदतीची याचना केली आहे. या प्रवासी जहाजाला मुंबई बंदर प्राधिकरणाने प्रवासी उतरवण्यासाठी परवानगी दिली नाही, तर येत्या दोन दिवसात हे जहाज पुन्हा युरोप देशाच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे. तसे झाल्यास या जहाजावर अडकलेल्या १३२ भारतीय व त्यापैकी ३५ मुंबईकर नागरिकांना युरोप देशाचा हजारो किलोमीटरचा प्रवास पुन्हा करावा लागेल. तिथेसुद्धा हाच प्रकार होणार असल्याने या जहाजावरील भारतीय प्रवासी मोठ्या विवंचनेत अडकले आहेत.या प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, बंदर प्राधिकरण, केंद्रीय नौकानयन यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या प्रशासनाने लक्ष घालून या सर्व भारतीयांना लवकर जहाजावरून मुंबईत उतरवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशन या एनजीओचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी ई-मेलद्वारे केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. जहाजावरील मुंबईतील काही प्रवाशांनी एनजीओचे विश्वस्त पिंमेटा व अल्मेडा यांना संपर्क केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.३५ प्रवासी मुंबई परिसरातीलया जहाजावर ६३७ प्रवासी नागरिक आहेत. त्यापैकी १३२ प्रवासी हे भारतीय नागरिक असून यातील बहुतांश प्रवासी हे गोवा आणि मंगलोर आदी ठिकाणचे आहेत. यातील ३५ जण हे मुंबई, उपनगर, ठाणे जिल्हा, मीरा रोड तसेच वसई-विरार तालुका व पालघर जिल्ह्यातील आहेत.-गिलरॉय मिस्किटा, वॉचडॉग फाउंडेशन, मुंबई
CoronaVirus: मुंबईजवळ समुद्रात अडकले १३२ भारतीय; ‘जैसे थे’ थांबण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 6:18 AM