मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे तब्बल १३५ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी २२ मार्चपासून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बंद झाली. परिणामी, २२ ते २६ मार्चपर्यंत पश्चिम रेल्वेला १३५ कोटी ६६ लाखांचा फटका बसला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.१४ एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत. भारतीय रेल्वेला याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूलसुद्धा बुडत आहे. २२ मार्चपर्यंत पश्चिम रेल्वेचे ७८.५० कोटींचे उत्पन्न बुडाले होते. त्यानंतर २४ मार्चपर्यंत १०७ कोटी आणि २६ मार्चपर्यंत १३५ कोटी ६६ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. यापुढे १४ एप्रिलपर्यंत हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे.पश्चिम रेल्वेला प्रवाशांच्या तिकीट दरासह इतर अनेक बाबींतून उत्पन्न मिळते. मात्र हे उत्पन्न आता मिळणे बंद झाले आहे.
CoronaVirus : कोरोनामुळे रेल्वेला १३५ कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:15 AM