CoronaVirus: मुंबईत १३५ कोरोना रुग्णांचे निदान; सहा मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:13 AM2020-04-20T04:13:53+5:302020-04-20T04:14:13+5:30
बळींचा आकडा १३२ तर रुग्णसंख्या २७२४
मुंबई : शहर उपनगरात रविवारी १३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २ हजार ७२४ वर पोहोचली आहे. याखेरीज, रविवारी सहा मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळी १३२ झाले आहेत. सहा मृत्यूंमध्ये एक मृत्यू रविवारी झाला असून अन्य मृत्यू अनुक्रमे १८ एप्रिल रोजी चार, १७ रोजी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नोंद झालेल्या सहा मृत्यूंपैकी पाच जणांना दीर्घकालीन आजार होते, तर एकाचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या सहापैकी पाच महिला होत्या, तर एका पुरुषाचा समावेश आहे. सहापैकी पाच रुग्ण ५० ते ६५ वयोगटातील असून एका महिला रुग्णाचे वय २६ आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांत रविवारी एकूण ३०३ संशयित रुग्ण दाखल झाले. तर रविवारी २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ४१३ कोरोना संशयित रुग्ण पालिका रुग्णालयांमध्ये दाखल झाले असून आजमितीस ३१० जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जसलोकमध्येही आणखी काही परिचारिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या परिचारिकांमध्ये पॉझिटिव्ह असून लक्षणे आढळली नाही, असेही रुग्णालय प्रशासनाने नमूद केले आहे.
तर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
व्होकार्डमध्ये २६ जणांचा लागण
मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच असून व्होकार्ड रुग्णालयातील आणखी २६ वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.