Coronavirus: कस्तुरबा रुग्णालयात १४ रुग्ण, मुंबईतील सहा, तर मुंबईबाहेरील आठ रुग्णांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 07:13 AM2020-03-17T07:13:00+5:302020-03-17T07:14:14+5:30
पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १० रुग्णांचे अलगीकरण करण्यात आले. विमानतळानजीकच्या मिराज हॉटेलमध्येही अलगीकरण सेवा सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून भांडुप येथील स्थानिक असलेली ४४ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १४ रुग्ण दाखल असून त्यात मुंबईतील ६ आणि मुंबईबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे.
पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १० रुग्णांचे अलगीकरण करण्यात आले. विमानतळानजीकच्या मिराज हॉटेलमध्येही अलगीकरण सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावरून सर्व कोरोना संशयित प्रवाशांना वेगळे ठेवण्यासाठी येथे पाठविण्यात येत आहे. प्रवाशांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची तीन पाळ्यांमध्ये नियुक्ती केली आहे. एकूण २४ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने प्रवाशांची तपासणी करून त्यांना ‘ब’ आणि ‘क’ प्रवर्गामध्ये विभागले जाते. ‘ब’ श्रेणीमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे मूल्यांकन, कागदपत्रे, जोखीम प्रोफाईल समितीला दिली जाते. या श्रेणीतील रुग्णांना सेव्हन हिल्समध्ये विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. कमी जोखमीच्या ‘क’ वर्गातील प्रवाशांचे घरगुती अलगीकरण केले जात आहे.
रुग्णाच्या पत्नीसह चिमुरडी ‘पॉझिटिव्ह’
कल्याण येथे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची ३३ वर्षीय पत्नी व तीन वर्षांच्या चिमुकलीची १४ मार्च रोजी तपासणी करण्यात आली होती, त्याचा
अहवाल सोमवारी आला असून त्या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे
निदान झाले आहे.
फिलिपाइन्सवरून आलेले कोरोनाबाधित
फिलिपाइन्स येथे प्रवास करून आलेल्या नवी मुंबईतील ४२ व ४७ वर्षीय पुरुष रुग्णांचा अहवाल सोमवारी आला असून ते दोघेही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. २ मार्चला ते फिलिपाइन्सवरून मुंबईत झाले होते.
सेव्हन हिल्समध्ये२४ डॉक्टरांचे पथक
पालिकेच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ३०० खाटांची व्यवस्था असून या ठिकाणी २४ डॉक्टर आणि आवश्यक स्टाफ तैनात ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
रिस्क प्रोफाईल कमिटी
‘कोरोना’च्या लक्षणांवरून पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून रुग्णांची विभागणी करण्यासाठी ‘रिस्क प्रोफाईल कमिटी’ची करण्यात आली आहे. यामध्ये तीव्र लक्षणे असलेल्या ‘ए’ कॅटेगरीतील रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ‘बी’ कॅटेगरीतील सौम्य लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या देशांतून प्रवास करून आलेल्या आणि अत्यंत सौम्य लक्षणे दिसलेल्या संशयितांना घरी पाठविण्यात येत असून त्यांच्यावरदेखील देखरेख ठेवण्याचे काम पालिकेच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कस्तुरबा रुग्णालयात दाखल रुग्णांची आकडेवारी
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण 498
नकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांची संख्या 452
सोमवारपर्यंत पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 6
सोमवारपर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण 433
सोमवारपर्यंत बाह्यरुग्ण विभागात आलेले रुग्ण 1865
सोमवारपर्यंत रुग्णालयात भरती झालेले रुग्ण 65