coronavirus: राज्यात १४९५ नवीन कोरोना रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २५ हजार ९२२
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 06:46 AM2020-05-14T06:46:44+5:302020-05-14T06:47:10+5:30
आजच्या ५४ मृत्यूंपैकी मुंबईतील ४०, पुण्यातील ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २ तसेच वसई-विरार आणि रत्नागिरीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यात बुधवारी तब्बल १,४९५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा एकूण आकडा २५ हजार ९२२ इतका झाला आहे. तर, आज दिवसभरात ४२२ रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ५,५४७ इतकी आहे.
आज दिवसभरात राज्यात ५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात ३३ पुरुष आणि २१ महिलांचा समावेश आहे. या ५४ मृत्यूंपैकी २९ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. तर २१ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. चार जण ४० वर्षांखालील आहेत. आजच्या ५४ मृतांपैकी ३६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९७५ इतकी झाली आहे.
आजच्या ५४ मृत्यूंपैकी मुंबईतील ४०, पुण्यातील ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २ तसेच वसई-विरार आणि रत्नागिरीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
१४३९ कंटेनमेंट झोन
आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.
राज्यात सध्या १,४३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १३,८०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५७.६५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
2,95,879
जगभरात मृत्यू
जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या
२ लाख ९५ हजारांच्यावर गेली असून, रुग्णांचा आकडाही ४३ लाख ९६ हजारांवर गेला आहे. रशियात गेल्या २४ तासांत १० हजार, तर अमेरिकेत सुमारे ४ हजार रुग्ण वाढले. त्याखालोखाल भारतात रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेत मृतांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.
26,400
रुग्ण झाले बरे
गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३,५२५ ने वाढली आहे. तामिळनाडू आणि गुजरात या दोन राज्यांत आता प्रत्येकी ९ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. देशांतील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ७८ हजार ५५ झाली आहे. त्यात बरे झालेले २६ हजार ४०० आणि मरण पावलेले २५५१ यांचाही समावेश आहे.