Join us

Coronavirus: मुंबईत २४ तासांत १५२ कोरोना रुग्ण; एकाच दिवसात सहा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 10:15 PM

मुंबईत बाराशे कोरोना रुग्ण, एकूण रुग्णसंख्या १ हजार २९८

मुंबई – राज्यासह मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसागणिक चिंताजनक बनत चालली आहे. रविवारी एकाच दिवसात मुंबईत सहा बळी गेले आहेत, त्यामुळे मुंबईत मृतांचा आकडा ९१ वर पोहोचला आहे. तर रविवारी दिवसभरात १५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २९८ झाली आहे.  

मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी वरळी, भायखळा, अंधेरी, ग्रँटरोड, वांद्रे (पश्चिम) या विभागांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच धारावी सारख्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतही दररोज रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण या विभागात आढळून आल्याने हे विभाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका कंबर कसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका व खासगी संस्थांच्या डॉक्टरांकरिता कोरोना (कोविड-१९) आजारावर उपचार पद्धतीबाबत वेबिनारद्वारे प्रशिक्षण घेण्यात आले. यात २ हजार ५४० फिजिशिअन व १२ प्राध्यापक , तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

मुंबईतील मृतांचा आकडा ९१ वर, रविवारी एकाच दिवशी सहा बळी

मुंबई शहर उपनगरात रविवारी १६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येने ९१ चा टप्पा गाठला आहे. १६ मृत्यूंपैकी रविवारी सहा मृत्यूंची नोंद कऱण्यात आली आहे. तर शनिवारी ११ एप्रिल रोजी नऊ आणि १० एप्रिल रोजी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमध्ये चार मृत्यू कस्तुरबा, सेंट जॅर्ज रुग्णालयात तीन, जोगेश्वरी ट्रॅमा रुग्णालयात दोन, केईएममध्ये दोन तर हिंदुजा, रहेजा, भाभा आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये १० पुरुष तर सहा महिलांचा समावेश होता. १६ रुग्णांपैकी १५ रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा आणि हृदयविकार असे दीर्घकालीन आजार होते, तर एका रुग्णाचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे.

रहेजामधून दोघांना डिस्चार्ज

माहिम येथील एल.एस रहेजा या खासगी रुग्णालयातून रविवारी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात सात वर्षांच्या मुलाला व ७६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. या दोघांवर यशस्वी उपचार करुन रविवारी त्यांना घरी पाठविण्यात आले.

नियमांना डावलून केंद्र बंद, डायलिसिस रुग्णांचे हाल

राज्यातील काही डायलिसिस केंद्र बंद असल्यामुळे डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. मात्र याविषयी राज्य शासनाने ९ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र तसे असूनही दादर येतील शुश्रूषा रुग्णालयात डायलिसिस रुग्णांचे हाल होत असल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या रुग्णालयात ८४ रुग्ण नियमितपणे डायलिसिससाठी येतात, त्यांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येते आहे. रुग्णालय प्रशासन व पालिका-राज्य शासनाच्या समन्वयाअभावी  हे केंद्र बंद ठेवले असल्याचे उघड झाले आहे. तरी अशा खासगी रुग्णालयांवर अंकुश ठेवून त्यांच्यावर देखरेख ठेवावी अशी मागणी स्थानिकांमधून होते आहे. त्याचप्रमाणे डायलिसिस केंद्र त्वरित सुरु करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई