मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून काही नवीन भागांमध्ये या आजाराचा प्रसार होऊ लागला आहे. आतापर्यंत अशी १ हजार ५७७ बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी गेल्या १४ दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण न सापडलेली ३६० बाधित क्षेत्र रद्द करण्यात आली आहेत. तर रुग्णांची संख्या अधिक असलेली तब्बल ५३३ बाधित क्षेत्र रेड झोनमध्ये आहेत. या क्षेत्रांमध्ये प्रवेश बंदी असून रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील बाधित क्षेत्रांचा आकडा ७७ एवढा होता. मात्र महिन्याभरात मुंबईतील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोना बाधित रुग्णांप्रमाणेच बाधित क्षेत्रांची संख्या वाढत १ हजार ५७७ वर पोहचली आहे. बाधित क्षेत्रांची वर्गवारी निळा, नारंगी आणि लाल अशी करण्यात आली आहे. यापैकी निळा आणि नारंगी बाधित क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या मोहिमांना प्रतिसाद मिळत आहेत. मात्र ५० टक्क्यांनी आधी बाधित क्षेत्र झोपडपट्ट्यांमध्ये असल्याने तिथे नियंत्रण मिळवणे पालिकेपुढे मोठे आव्हान ठरत आहेत.
वरळी, धारावी, भायखळा, कुर्ला येथील झोपडपट्टी भागात कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. या भागात बाधित क्षेत्रांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वरळी, धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टी भागांमध्ये महापालिकेचे आरोग्य पथके तैनात आहेत. या पथकामार्फत बाधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी, संशयित रुग्णाचे विलगीकरण, अन्नधान्य वाटप आदी काम स्थानिक विभाग कार्यालयामार्फत सुरू आहे. तर गेल्या १४ दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण न सापडलेल्या ३६० बाधित क्षेत्र रद्द करण्यात आली आहेत.बाधित क्षेत्र म्हणजे काय?कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण सापडतच सदर व्यक्ती राहत असलेली इमारत, चाळ परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. या ठिकाणी आतल्या रहिवाशांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आणि बाहेरच्या लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा सशुल्क पद्धतीने भगिवण्यात येत आहेत. पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयामार्फत याबाबत नियोजन केले जात आहे. या परिसरात सर्व संशयित लोकांची चाचणी करून त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्या परिसरात प्रवेश बंदी लागू असते.