CoronaVirus: मुंबईत रुग्णसंख्या तीन हजारांवर; सोमवारी आढळले १८७ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:49 AM2020-04-21T02:49:40+5:302020-04-21T06:44:48+5:30
सात मृत्यूंची नोंद, तर एकूण बळी १३९
मुंबई : राज्यासह मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. यात सोमवारी १८७ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने ही रुग्णसंख्या ३ हजार ३२वर पोहोचली आहे. तर सोमवारी सात मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा १३९ झाला आहे.
१४ ते १७ एप्रिल दरम्यान विविध प्रयोगळांमध्ये झालेल्या १३७ कोरोना चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाल्यामुळे या रुग्णांचा अहवालात त्यांचा अंतर्भाव केला आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू असून या १३८ क्लिनिकमध्ये ५,४२८ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी २०३९ संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी १,३४४ रुग्ण, सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना व सर्वेक्षण अंतर्गत संशयित रुग्णांचा शोध लागला आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील ४३,५९१ इमारतींच्या आवारात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
नानावटी रुग्णालयात आठ कर्मचाऱ्यांना कोरोना
विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात रुग्णालयातील १ डॉक्टर, दोन परिचारिका, १ मार्केटिंग एक्झिकेटीव्ह, १ सुरक्षा रक्षक, १ किचन बॉय, १ एसी मेंटेनन्स स्टाफ, १ लॉड्रीवाला अशा कर्मचाºयांचा समावेश आहे. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर पालिकेने येथील प्रत्येक कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली असून जोपर्यंत कोरोना टेस्टचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही येथील कर्मचाºयांना घरी क्वारंटाइन होण्याचे आदेश दिले असल्याची माहिती के पश्चिम वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.
१३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना
चर्चगेट येथील पालिकेचे कान, नाक, घसा रुग्णालयातील १३ वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. आजमितीस शहर उपनगरातील खासगी-पालिका, सरकारी रुग्णालयातील सुमारे २५० वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आयएमएने केली कस्तुरबा रुग्णालयाला मदत
कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे गंभीर रुग्णांसाठी इंजेक्शन टोसिलिझुमॅबचा वापर करण्यात येतो. या इंजेक्शनची कमतरता भासू नये आणि इंजेक्शनच्या खर्चाचा भार कमी करावा म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पुढाकार घेत तीन लाखांची इंजेक्शन मदत म्हणून दिली आहेत, अशी माहित डॉ. अनिल पाचणेकर यांनी दिली.
आपत्कालीन नियंत्रण कक्षातील दोन कर्मचाऱ्यांनाही लागण
संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या कार्यात समन्वयाची महत्त्वाची भूमिका बजावणारा महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्षच कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. या कक्षातील दोन कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे येथील अन्य कर्मचाºयांनाही तिथेच क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र मुख्य नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळासह सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.