- मनोहर कुंभेजकर
वांद्रे ते दहिसर पूर्व व पश्चिम भागात विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते.येथील लोकसंख्या सुमारे 65 लाख असून येथे झोपडपट्यांचे प्रमाण देखिल जास्त आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे पूर्व,कलानगर येथील मातोश्री निवासस्थान पालिकेच्या एच पूर्व वॉर्ड मध्ये मोडते.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आज मितीस पश्चिम उपनगरात कोरोनाचे 191 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम उपनगरातील परिमंडळ 3 चे पालिका उपायुक्त पराग मसुरकर,परिमंडळ 4 चेपालिका उपायुक्त रणजित ढाकणे,परिमंडळ 7 चे पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यासह येथील सर्व 9 साहाय्यक पालिका आयुक्त व त्यांचा संबंधीत अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि 100 टक्के सेवा-सुविधा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असल्याचे चित्र आहे.
पालिकेच्या वॉर्ड विभागणी नुसार पश्चिम उपनगरात एच पूर्व,एच पश्चिम, के पूर्व,के पश्चिम,पी दक्षिण, पी उत्तर,आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात.पश्चिम उपनरातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून के पश्चिम वॉर्ड असून यामध्ये कोरोनाचे 40 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्या खालोखाल पी उत्तर वॉर्ड मध्ये 32,एच पूर्व मध्ये 31,के पूर्व मध्ये 26,आर दक्षिण मध्ये 18,एच पश्चिम मध्ये 16,पी दक्षिण मध्ये 13,आर मध मध्ये 8 व आर उत्तर मध्ये 7 असे एकूण पश्चिम उपनगरात कोरोनाचे 191 रुग्ण आहेत.
कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यास रुग्णवाहिकेतून त्याला वेळीच उपचार मिळण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करणे, कोरोनाबाधीत रुग्ण व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करणे,तसेच त्यांच्या घरातच 14 दिवस विलगिकरण करणे, झोपडपट्टी सारख्या वस्तीत जर विलगिकरणाची सोय नसेल तर पालिकेच्या विलगिकरण कक्षात त्यांची राहण्याची, जेवण,चहा,नाष्टाची व्यवस्था करणे,वैद्यकीय शिबीर आयोजित करून त्या कोरोना बाधीत परिसरातील नागरिकांची कोरोना टेस्ट करणे,कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास त्याची इमारत पोलिसांच्या मदतीने सील करणे,गरजू नागरिकांची स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करणे ही आणि प्रसंगी येतील ती कामे करण्यात पालिका प्रशासन सक्षम आहे.नागरिकांनी कृपया पालिकेला सहकार्य करून घरातच राहावे ,सुरक्षित राहावे असे आवाहन पालिका प्रशासनाने येथील नागरिकांना केले आहे.