CoronaVirus News: आयसीयू बेडसाठी दोन दिवस वाट पाहावी लागली; मुंबईत कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 07:26 PM2020-05-29T19:26:45+5:302020-05-29T19:27:46+5:30
आतापर्यंत शहरात पाच डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई: शहरातील कोरोना रुणांची आणि मृतांची संख्या सातत्यानं वाढत आहे. दोनच दिवसांपूर्वी ट्रॉम्बेमधील एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन रुग्णालय) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपासून आयसीयू बेडची मागणी करूनही बेड उपलब्ध न झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.
अंधेरीत पन्नाशीतल्या एका आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी सोमय्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते वास्तूशास्त्र सल्लागार म्हणूनही काम करायचे. कुर्ला डॉक्टर असोसिएशनचे सांस्कृतिक सचिव डॉ. भगत सिंह पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे पाच डॉक्टरांचा बळी गेला आहे. यातील तीन मृत्यू सायन रुग्णालयात झाले आहेत.
ट्रॉम्बेमध्ये वास्तव्यास असलेल्या डॉक्टरांना त्यांच्या १७ वर्षीय मुलानं उपचारांसाठी २४ मे रोजी सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. प्रतीक्षा यादीत त्यांचा क्रमांक ४१ वा होता. त्यामुळे त्यांना कॅज्युल्टी वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. त्यावेळी वॉर्डमध्ये अनेक रुग्णांना बेडअभावी जमिनीवर ठेवण्यात आलं होतं, असा दावा त्यांच्या मुलानं केला.
अखेर २५ मे रोजी डॉक्टरांना कोरोना वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याचं मुलानं सांगितलं. 'त्यांना बेड देण्यात यावा, अशी विनंती मी रुग्णालयातल्या डॉक्टरांकडे करत होतो. मात्र माझ्यासारखेच अनेक जण त्यांच्याकडे हीच विनंती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अखेर २५ मे रोजी डॉक्टरांचा मृत्यू झाला,' अशी माहिती त्यांच्या मुलानं दिली. कोरोनामुळे मृत पावलेले डॉक्टर सरकारी रुग्णवाहिकांमध्ये सेवा द्यायचे. बहुतांशवेळा ते रात्री आपत्कालीन परिस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करायचे.