Coronavirus : मुंबईत असं घडणं दुर्मिळच; लोकल प्रवाशांचा घटलेला आकडा पाहून अवाक् व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:45 AM2020-03-20T07:45:15+5:302020-03-20T07:45:43+5:30

‘वर्किंग डे’ असलेल्या १८ मार्च रोजी उपनगरी रेल्वे मार्गावरील सुमारे २२ लाख प्रवासी घटले. १८ मार्च रोजी सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.

Coronavirus: 22 lakh passengers on suburban route reduced | Coronavirus : मुंबईत असं घडणं दुर्मिळच; लोकल प्रवाशांचा घटलेला आकडा पाहून अवाक् व्हाल!

Coronavirus : मुंबईत असं घडणं दुर्मिळच; लोकल प्रवाशांचा घटलेला आकडा पाहून अवाक् व्हाल!

Next

मुंबई : नागरिकांना लोकलमध्ये गर्दी करू नये, अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. या हाकेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. ‘वर्किंग डे’ असलेल्या १८ मार्च रोजी उपनगरी रेल्वे मार्गावरील सुमारे २२ लाख प्रवासी घटले. १८ मार्च रोजी सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे प्रवासात गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या भीतीमुळे रेल्वे प्रवासातील प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र कोरोनामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १८ मार्च रोजी ५८ लाखांवर आली आहे. म्हणजे तब्बल २२ लाख प्रवासी कमी झाले आहेत.
१८ मार्च रोजी, मध्य रेल्वे मार्गावर ३२ लाख ३६ हजार ७५ प्रवाशांनी प्रवास केला. तर पश्चिम रेल्वे मार्गावरून २६ लाख २९ हजार ९७४ प्रवाशांनी प्रवास केला. मागील आठवड्यापासून दररोज सुमारे ५ ते १० लाख प्रवाशांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

५० टक्केप्रवासी घटले : मध्य रेल्वे मार्गावरून ११ मार्चच्या बुधवारी ६७ लाख ६८ हजार ७५४ प्रवाशांनी प्रवास केला. तर, याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावर ५५ लाख ४० हजार २४७ प्रवाशांनी प्रवास केला. १८ मार्चच्या बुधवारी मध्य रेल्वे मार्गावरून ३२ लाख ३६ हजार ७५ प्रवाशांनी, तर पश्चिम रेल्वे मार्गावरून २६ लाख २९ हजार ९७४ प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजे या दोन बुधवारी ‘वर्किंग डे’च्या दिवशी ५० टक्के प्रवासी घटल्याची नोंद झाली आहे.

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल बंद

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल २० मार्चपासून बंद करण्यात येतील. एसी लोकलच्या वेळेत नॉन एसी लोकल चालविण्यात येतील, असा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
खोकला आणि शिंकल्यामुळे हवेत तुषार उडले जातात. हे तुषार थंड वातावरणात लवकर सुकत नाहीत. विषाणुमिश्रित हे तुषार एसीच्या वातावरणात जास्त कालावधीपर्यंत जिवंत राहतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुढील ३१ मार्चपर्यंत एसी लोकल बंद राहतील.

ठाणे-पनवेल एसी लोकलही बंद
ठाणे : कोरोनामुळे ठाणे-पनवेल-वाशी मार्गावर धावणारी एसी लोकल शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. ती ३१ मार्चपर्यंत धावणार नसल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले.
ट्रान्स हार्बरवर ३१ जानेवारीपासून ठाणे-पनवेल ही लोकल सुरू झाली. या लोकलने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या महिन्याभरानंतरही अत्यल्प आहे. दिवसाला सरासरी १८ तिकिटे आणि पाच पासची विक्री होत होती. मात्र, कोरोनामुळे तिकीट विक्रीची संख्या १४ वर आली आहे. त्यातच आता, कोरोनामुळे एसी लोकल ३१ मार्चपर्यंत धावणार नाही.

Web Title: Coronavirus: 22 lakh passengers on suburban route reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.