मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांत तब्बल २२१ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे.राज्यभरात १ लाख २० हजार पोलीस कर्मचारी, तर १८ ते २० हजार अधिकारी आहेत. अन्य कर्मचारी मिळून राज्य पोलीस दलात जवळपास पावणेदोन लाख पोलीस आहेत. यापैकी १०६ अधिकाऱ्यांसह तब्बल ९०१ अंमलदार म्हणजे १ हजार ७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यातील ७ जणांचा मृत्यू झाला. ११३ जण उपचारांअंती कोरोनामुक्त झाले, तर ८८७ जणांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत दिवसाला ६० ते ७० ने वाढणारा हा आकडा तीन ते साडेतीन पटीने वाढला आहे. दरम्यान, कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत आतापर्यंत २०० हून अधिक पोलीस कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित पोलीस जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात आहेत. येथील ३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यात एक आयपीएस अधिकारीही आहे.कारागृहातील २६ कर्मचारीलॉकडाउन असलेल्या आर्थर रोड कारागृहात आतापर्यंत २६ पोलीस आणि १५८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.अन्य यंत्रणांवर जबाबदारी देणे गरजेचेपोलिसांवरचा वाढता ताण कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्य यंत्रणांवरही जबाबदारी सोपविणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.हल्ले सुरूचपोलिसांवरील हल्ले सुरूच आहेत. यात ८२ पोलीस जखमी झाले असून त्यात एक होमगार्डचाही समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांवर हल्ल्यांप्रकरणी २०७ गुन्ह्यांची नोंद झाली असून ७४७ जणांना अटक झाली आहे.
coronavirus: राज्यात २४ तासांत २२१ पोलिसांना कोरोनाची लागण, बाधित पोलिसांची एकूण संख्या हजारहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:27 AM