मुंबई : लॉकडाउननंतरही राज्यासह मेट्रो शहरांत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढत असून विषाणूवरील नियंत्रणाचे आव्हान अधिक कठीण होत आहे. राज्यात रविवारी ६७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, कोरोना (कोविड-१९) मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ५४८ वर पोहोचली आहे.
मुंबईत दिवसभरात ४४१ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ८ हजार ८०० झाली आहे, तर २१ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ३४३ झाला आहे. राज्यात रविवारी २७ मृत्यूंची नोंद झाली, त्यापैकी मुंबईतील २१, पुण्यातील चार, भिवंडीतील १ आणि नवी मुंबईतील १ मृत्यू आहे. महासंकटात दिलासाजनक बाब म्हणजे राज्यात दिवसभरात ११५ तर आजपर्यंत २ हजार ११५ जण कोरोनामुक्त झाले.
सध्या राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३,१५८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी १ लाख ५६ हजार ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या ९९७ कंटेनमेंट झोन असून एकूण ११ हजार ७८ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी ५१ लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. सध्या राज्यात दर दहा लाख लोकसंख्येमागे कोविड-१९ प्रयोगशाळा चाचणीचे प्रमाण १ हजार २३७ इतके आहे, हेच प्रमाण देशपातळीवर ८०३ इतके आहे.केरळमध्ये २४ तासांत नवा रुग्ण नाहीदेशातील पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झालेल्या केरळमधून सकारात्मक वृत्त आहे. २४ तासांत (रविवारी) केरळमध्ये एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. विशेष म्हणजे महिनाभरापासून एकाही नव्या रुग्णाची नोंद नसल्याने गोवादेखील कोरोनामुक्त झाले आहे. ईशान्येकडील राज्येही कोरोनामुक्तीच्या दिशेने दमदारपणे वाटचाल करीत आहेत. आसामने आजपासून नजीकच्या राज्यांसाठी सीमा खुली केली. सिक्किम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा व मणिपूरमध्येही गेल्या १४ दिवसांमध्ये नवा रुग्ण नसल्याने त्यांचीही वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली. आसाममधील ३० ग्रीन तर ३ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत.रशियात दहा हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण जगात रशियात सर्वाधिक10 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर कोरोना प्रसाराचे केंद्र ठरलेल्या चीनमध्ये २ नवे रुग्ण समोर आले. आशिया खंडात केवळ भारत, टर्की व संयुक्त अरब अमिरातीमध्येच १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. आशिया खंडात ५ लाख ५३ हजार ३९१ रुग्ण असले तरी बरे झालेल्यांची संख्या २ लाख ८७ हजार १४३ वर गेली आहे.