CoronaVirus News: मुंबई पोलीस दलातील २९ योद्ध्यांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:54 AM2020-06-17T02:54:50+5:302020-06-17T02:55:11+5:30
गेल्या २४ तासांत तीन पोलिसांचं निधन
मुंबई : मुंबई पोलीस दलात सोमवारी रात्री आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, आतापर्यंत २९ योद्ध्यांना कोरोनामुळे जीव गमवला आहे. तर राज्यभरातील मृत पोलिसांचा आकडा ४३ वर पोहचला आहे.
निर्मल नगर पोलीस ठाण्यातील पोलिसाने काल रात्री कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे गेल्या २४ तासांत तब्बल तीन पोलिसांना प्राण गमवावे लागले. राज्यभरात १,३९९ कोरोनाग्रस्त पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
‘त्या’ कॉलने वाढली चिंता
शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील एका शिपायाने रुग्णालयाकडून आलेल्या ‘तयारीत रहा’ या कॉलच्या भीतीमुळे अनोळखी कॉल घेणेच बंद केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्येत ठीक नसल्याने त्यांनी जवळच्या रुग्णालयात कोरोना चाचणी केली. दुसऱ्याच दिवशी तेथील परिचारिकेने फोन करून चौकशीस सुरू केली. अहवालाबाबत विचारताच, त्याबाबत स्पष्ट न सांगता कुटुंबीय, मित्रांचे मोबाइल क्रमांक घेतले. पोलीस असल्याचे सांगताच वरिष्ठांसह पोलीस ठाण्याचाही क्रमांक घेतला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या शक्यतेतून घरातल्यांना धीर दिला. तेव्हापासून कोरोना रुग्णाला ट्रीट करतात तशी वागणूक सुरू झाली. परिचारिकेचा कॉल आज येईल, उद्या येईल या चिंतेत आठवडा गेल्याचे त्यांनी सांगितले.