Join us

Coronavirus: मराठी कलावंत राहत असलेलं बिंबीसार नगर झालं कोरोनामुक्त; ३ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:57 PM

या कुटुंबातील तीनही करोनाबाधित रुग्णांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

मनोहर कुंभेजकर

मुंबई--बिंबीसार नगर झाले कोरोना मुक्त तीनही रुग्णांची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निःस्वारा सोडला आहे.गेल्या 31मार्च रोजी गोरेगाव पूर्व बिंबीसार नगरा मधील  इमारत क्र २० मधील एका 24 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याने खळबळ माजली होती. बिंबीसार नगरमध्ये प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री,सुबोध भावे, जयवंत वाडकर,राजन ताम्हाणे,अतिशा नाईक आदी दिगग्ज  कलावंत येथे राहात असल्याने बिंबीसार नगरला कोरोना बाधीत रुग्ण सापडला अशी बातमी मग वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती.

 बिंबीसारनगरमध्ये  दि, ३१ मार्च रोजी  इमारत क्रमांक 20 मध्ये एक रुग्णास कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत क्र १९ ते ३१ सील करून नगरातील सदर इमारतीचा रहदारीचा रस्ता इमारत क्र १९ येथे  बंद केला होता.तसेच सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व रहिवाशी व दुकानदार यांची करोना संसर्ग तपासणी केली होती.त्यांपैकी सदर रुग्ण व त्याचे फक्त दोन कुटुंबीय यांच्या व्यतिरिक्त इतर सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली.त्यामुळे मुंबई महापालिकेने आता सदर नऊ इमारतीचे सीलची मर्यादा कमी करून फक्त इमारत क्र २० साठीच सील ठेवले होते व  बंद केलेला रहदारीचा रस्ता  आता पूर्ववत मोकळा केला होता अशी माहिती बिंबिसार नगर को ऑप हौ सो असोसिएशनचे सचिव विलास तावडे यांनी लोकमतला दिली.

या कुटुंबातील तीनही करोनाबाधित रुग्णांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.त्यापैकी सर्व रुग्णांना ज्याप्रमाणे त्यांची प्रकृती सर्वसाधारण होत गेली,त्यानुसार त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता.तर दि,14 रोजी शेवटच्या उर्वरित एकमेव रुग्णासही डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे पी दक्षिण वॉर्डने पोलिसांच्या मदतीने या भागात लावलेले सील आता काढण्यात आले आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निःस्वारा सोडला अशी या शुभवर्तमानाची बातमी  विलास तावडे यांनी दिली.                                            दरम्यानच्या कालावधीत आपल्या सर्वांच्या संयम व शिस्तबद्धता यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे  व यापुढेही आपण सर्व दि,३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या सर्व अत्यावश्यक आदेशाचे तंतोतंत पालन करून सदर करोना रोगाच्या संकटाचा मुकाबला कराल असे आवाहन त्यांनी येथील नागरिकांना केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई