मुंबई : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स होम सोसायटीमधील ३० मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी चिल्ड्रन्स होम सोसायटीमधील व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून काही मुलांना खोकला झाला असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेने चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये फिवर कॅम्पचे आयोजन केले होते. या फिवर कॅम्प मध्ये एकूण २६८ मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली. यातील ८४ मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या मुलांचे कोरोनाचे अहवाल आल्यानंतर त्यातील तीस मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ३० मुलांपैकी २ मुलांना कर्करोग असल्याने त्यांच्यावर सायनच्या 'लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित २८ मुलांना वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. चिल्ड्रन होम सोसायटीमधील ३० मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे येथील परिसर संपूर्णपणे सिल करण्यात आला आहे. तसेच या परिसराचे निर्जंतुकीकरणदेखील करण्यात आले आहे. येथील इतर मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे सर्व खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
CoronaVirus News: मानखुर्दच्या 'चिल्ड्रन होम सोसायटी'मधील ३० मुलांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 6:22 PM