मुंबई : आर्थर रोड कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची वाढती संख्या, त्यात कारागृहाच्या आवारातच कोरोनाबाधित कैद्यांवर उपचार सुरू असल्याने कैदी अवस्थ झाले आहेत. अशातच ३०० हून अधिक कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या शक्यतेतून गेल्या आठवड्यात जेवण नाकारत उपोषण छेडले. त्यात कारागृहाबाहेर कैद्यांच्या नातेवाईकाने गोंधळ घातल्याने आर्थर रोड कारागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कैद्यांना कोरोनामुळे मृत्यूची भीती सतावत असल्याने त्यांना आवरताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.आर्थर रोड कारागृहात ८०० ची क्षमता असताना २८०० कैदी आहेत. त्यापैकी १८५ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृहातील कैदी अवस्थ आहेत. कोरोनाबाधित कैद्यांनाही येथेच ठेवल्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने केला. कैद्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बॅरेक क्रमांक ६ आणि ११ मधील कैद्यांनी उपोषण केले. तर कारागृहाबाहेर कैद्यांच्या कुटुबियांनीही गोंधळ घातला. बाहेरच्यांना पोलिसांनी समजावून घरी पाठवले.कारागृहात आक्रमक झालेल्या कैद्यांना बंदोबस्तासाठी तैनात निमलष्करी दलाने कसेबसे शांत केले. २ तारखेला बॅरेक क्रमांक ८ मधील एक कैदी स्वयंपाक घरात गेला होता. तेथे तो चक्कर येवून पडताच त्याला रुग्णालयात दाखल केले. अहवालात त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अपुºया मनुष्यबळाच्या खांद्यावर येथील कैद्यांची जबाबदारी आहे. त्याबाबतही राग व्यक्त होत आहे.आर्थर रोड कारागृहातील या स्थितीबात कारागृह व सेवासुधार विभागाचे महानिरीक्षक दीपक पांडे यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
coronavirus: आर्थर रोड कारागृहातील ३०० कैद्यांना संसर्गाचा संशय, कैद्यांचे उपोषण, गोंधळाची परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:52 PM