CoronaVirus : दिलासादायक! मुंबईतील ३१ पत्रकार 'कोरोना'मुक्त!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 09:17 PM2020-04-26T21:17:21+5:302020-04-26T21:17:53+5:30
CoronaVirus : या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या पैकी ५३ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे आढळले होते.
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना चाचणीचे विशेष तपासणी शिबिर घेण्यात आले होते. यात एकूण १७१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी ५३ प्रतिनिधींना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर महानगरपालिकेने यशस्वीरित्या उपचार केले. यातील ३१ जणांना कोरोना बाधा मुक्त झाल्याने त्यांना रविवारी घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईतील प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १६ व १७ एप्रिल २०२० असे दोन दिवसीय विशेष तपासणी शिबिराचे आयोजन महानगरपालिका मुख्यालयासमोर स्थित प्रेस क्लबशेजारी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सभागृहात केले होते. या शिबिरात एकूण १७१ प्रतिनिधींची तपासणी करण्यात आली होती. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या पैकी ५३ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे आढळले होते. महापालिका प्रशासनाने या कोरोना बाधित प्रतिनिधींना त्वरित संपर्क साधून त्यांना क्वारंटाईन केले होते. तसेच आवश्यक सर्व उपचार सुविधा पुरविल्या.
दरम्यान, दुसऱ्या तपासणी अहवालामध्ये ३१ प्रसार माध्यम प्रतिनिधीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या प्रतिनिधीनी महानगरपालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सर्व डॉक्टर्स व इतर अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या ३१ जणांना पुढील १४ दिवस घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शक सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
कोरोनामुक्त पत्रकारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत
सायन प्रतिक्षानगर येथे रविवारी कोरोनामुक्त झालेल्या पत्रकारांचे निवासी वसाहतीतील अन्य रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या पत्रकारांमुळे मागील काही दिवसांपासून येथील पत्रकार वसाहतीतील रहिवाशांनाही क्वारंटाइनचे आदेश देण्यात आले होते. रविवारी या पत्रकारांनी मिळून अन्य सहकाऱ्यांचे धैर्य वाढवत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.