मुंबई : मुंबईत रविवारी ३२८ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या पाच हजार ४०७ वर पोहोचली आहे. तर रविवारी १२ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २०४ वर गेला आहे. शहर उपनगरात दिलासा देणारी बाब म्हणजे दादर, माहिमध्ये एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही, तर धारावीतील रुग्णांची संख्या २७५ वर पोहोचली आहे.
मुंबईत रविवारी १३५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजमितीस ८९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण डिस्चार्ज रुग्णांपैकी ९५ रुग्ण हे मुंबईबाहेरील निवासी असून , त्यांनी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतले आहेत. २२ व २३ एप्रिलदरम्यान प्रयोगशाळांमध्ये झालेल्या ६१ कोरोना (कोविड१९) रुग्णांच्या चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाल्याने त्यांचा अतंर्भाव अहवालात केला आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व पातळीवरच्या उपाययोजना परिणामकारक ठरत आहेत. सोबतच महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रभावी उपचार पद्धतीमुळे रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढतो आहे. आतापर्यंत आढळलेल्या ४ हजार ८७० रुग्णांपैकी ७६२ जण बरे होवून घरी परतले आहेत. दीड कोटी मुंबईकर जनतेच्या दैनंदिन जीवनाची काळजी वाहत असताना कोरोना बाधितांना योग्य, दर्जेदार उपचार देऊन त्यांना कोरोना मुक्त करण्यात देखील आरोग्य यंत्रणा प्रभावी ठरली आहे. यामुळेच शनिवारपर्यंत आढळलेल्या ४ हजार ८७० रुग्णांपैकी ७६२ जण बरे होवून घरी परतले आहेत. जी/दक्षिण विभागात सर्वाधिक ६०० रुग्ण आढळले असले तरी त्यातील १२५ बरे देखील झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाला समाधान लाभले आहे. येत्या दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा वेग वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र कमी होवून नागरिकांची दिनचर्या सुरळीत होण्यास आणखी मदत मिळते आहे.
राज्यात १९ बळी, एकूण ३४२ मृत्यूराज्यात रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये ७३ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. त्यामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे.