Coronavirus : राज्यात ३३ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 07:16 AM2020-03-16T07:16:43+5:302020-03-16T07:16:53+5:30
शनिवारी रात्री पिंपरी चिंचवड येथील ५ आणि रविवारी सकाळी औरंगाबाद येथील १ रुग्ण, पुणे येथे एक रुग्ण कोरोनाबाधित आल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ झाली
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना अधिसूचना लागू झाल्याने आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील खाटा अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या ३३ रुग्ण आढळून आले आहेत, राज्यात ९५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षांमध्ये ७५ संशयित रुग्ण भरती आहेत.
शनिवारी रात्री पिंपरी चिंचवड येथील ५ आणि रविवारी सकाळी औरंगाबाद येथील १ रुग्ण, पुणे येथे एक रुग्ण कोरोनाबाधित आल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ झाली असून औरंगाबादमधील रुग्णालयात भरती असलेल्या ५९ वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तर पिंपरी चिंचवड भागातील व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
मॉल, म्युझियम बंद
दरम्यान, राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल यासोबत आता पुरातन वस्तुसंग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाºया परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलाव्यात, असे आयोगाला कळविण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ब्रीथ अॅनलायजर टेस्ट रद्द करण्याच्या सूचना
पोलिसांच्या माध्यमातून वाहनचालकांची केली जाणारी ब्रीथ अॅनलायजर चाचणी थांबविण्यासाठी सूचना दिल्या जातील, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
विमानतळांवर १ लाख ८१ हजार प्रवाशांची तपासणी
१५ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ हजार ५८४ विमानांमधील १ लाख ८१ हजार ९२५ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १०४३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७५८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ६६९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत.